चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
दर्पण व पत्रकार दिनाचे औचित्य साधून ६ जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्य दलातून सेवा निवृत्त झालेले अशोक मोरे उपस्थित होते.
उपस्थित पाहूणे आणि सर्व पत्रकारांचे स्वागत संस्थापक अनिल धुपदाळे यांनी करुन चंदगड तालुका पत्रकार संघाच्या स्थापनेपासून ते आज पर्यंतच्या कार्याचा उल्लेख करुन राज्यातील तालुक्यातून उत्कृष्ट पत्रकार संघ म्हणून गौरविण्यात आले होते. पत्रकार संघाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात याची माहिती सांगितली.
प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त अशोक मोरे यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांचा देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो असे सांगून त्यांनी आपल्या अठरा वर्षांच्या सेवा काळातील गौरवास्पद कामाची माहिती विषद केली.
या नंतर चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार अनिल धुपदाळे यांच्या आई-वडीलांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार दै. पुढारी चे तालुका प्रतिनिधी संदीप तारीहाळकर यांना देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. हा पुरस्कार तालुका पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाच्या वेळी देण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृती चिन्ह तसेच शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात येतो, पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.
या कार्यक्रमा नंतर चंदगड तालुका पत्रकार संघाची सन २०२६-२०२७ साठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. चंदगड तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष म्हणून साप्ताहिक चंदगड टाईम्सचे संपादक संतोष सावंत -भोसले यांची तर उपाध्यक्षपदी साप्ताहिक सत्यघटनाचे संपादक राहूल पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले, सेक्रेटरी चेतन शेरेगार यांच्यावर खजिनदार पदाची जबाबदारी देण्यात आली. जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील यांनी सावंत-भोसले आणि राहुल पाटील यांना पुष्प देऊन अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थाध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांनी केले. अनिल धुपदाळे, श्रीकांत पाटील, राहूल पाटील, प्रदीप पाटील, उत्तम पाटील, डिजीटल मिडिया तालुका अध्यक्ष संपत पाटील, सागर चौगुले, मारुती पाथरवट, संजय पाटील, राजेंद्र शिवणगेकर, संजय केदारी पाटील इत्यादी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment