चंदगड / सी एल वृत्तसेवा
आजच्या "धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात माणूस हसणं विसरत चालला आहे. कामाचा ताण, अभ्यासाचा दबाव आणि अपेक्षांची ओझी यामुळे जीवनात तणाव वाढत आहे. या तणावावर मात करण्यासाठी हास्य हेच सर्वात प्रभावी व जालीम औषध आहे, "असे प्रतिपादन संजय साबळे यांनी केले.
ते जयप्रकाश विद्यालय येथे आयोजित ‘चला तणावमुक्त होऊया’ या विशेष व्याख्यानात बोलत होते. “उच्च स्वप्ने पाहा आणि त्या स्वप्नांचा सातत्याने पाठलाग करा. हसत-खेळत प्रयत्न केले, तर यश हमखास मिळते,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले. विनोदी उदाहरणे, ग्रामीण शैलीतील किस्से आणि दैनंदिन जीवनातील प्रसंग सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त जीवनाचा मंत्र दिला.
आजच्या धक्का-धकीच्या जीवनात आनंदी राहणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच मन:शांती जपली पाहिजे, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानादरम्यान सभागृहात हास्याचे फवारे उडाले, तर विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी. जे. मोहणगेकर होते. प्रास्ताविक डी. एस. बिर्जे यांनी केले. कार्यक्रमास व्ही. एस. सुतार, पी. एन. तरवाळ आणि ए. जे. कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. व्ही. कुंभार यांनी मानले.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून तणावमुक्त, आनंदी जीवन जगण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचला आहे.

No comments:
Post a Comment