चंदगड: सी. एल. वृत्तसेवा
विज्ञानाचा अभ्यास म्हणजे केवळ पाठांतर आणि परीक्षा नव्हे, तर आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांमागील 'का' आणि 'कसे' शोधणे म्हणजे विज्ञान होय. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदव्या मिळवून चालणार नाही, तर नाविन्यपूर्ण संशोधनाची जोड देऊन जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याची संधी विद्यार्थ्यांकडे आहे, असे प्रतिपादन आयसीटी (ICT) मुंबई येथील ख्यातनाम रिसर्च स्कॉलर सुदर्शन काबुगडे यांनी केले. मराठी विज्ञान परिषद आणि करिअर गायडन्स सेल व सायन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित 'संशोधनाकडे वळा' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
सुदर्शन काबुगडे यांनी आपल्या व्याख्यानात विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना अत्यंत साध्या आणि रंजक उदाहरणांनी स्पष्ट केल्या. पीपीटी सादरीकरणाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, "संशोधन हे प्रयोगशाळेच्या चार भिंतीतच होते असे नाही, तर शेतीपासून ते अवकाशापर्यंत प्रत्येक क्षेत्रात संशोधनाला वाव आहे." विज्ञानातील बारीक-सारीक क्लुप्त्या उलगडताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशील राहण्याचे आवाहन केले. विशेषतः 'प्युअर सायन्स' मध्ये करिअर करून आयसीटी, आयसर (IISER), आणि आयआयटी (IIT) सारख्या नामांकित संस्थांमध्ये संशोधनासाठी कशा प्रकारे प्रवेश मिळवता येतो, याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. त्यांच्या या ओघवत्या शैलीतील व्याख्यानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, व्याख्यानाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासा दर्शवणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ करण्यासाठी महाविद्यालय अशा उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देत आले आहे. संस्थेचे संचालक व ऑडिटर ॲडव्होकेट एन. एस. पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःची प्रगती साधताना समाजाचे देणे विसरू नये, असा मोलाचा सल्ला दिला. तत्पूर्वी, समन्वयक डॉ. आर. एन. साळुंखे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. एन. एस. मासाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समन्वयक प्रा. एम. एस. दिवटे यांनी मानले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. एम. एम. माने, डॉ. के. एन. निकम, डॉ. बी. एम. पाटील, डॉ. आर. के. तेलगोटे, प्रा. एल. एन. गायकवाड, डॉ. जी. वाय. कांबळे,डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. राजेंद्रकुमार आजरेकर, प्रा. महादेव गावडे यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदगड परिसरात या उपक्रमाचे आणि काबुगडे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment