चंदगड: सी. एल. वृत्तसेवा
साहित्याचा वारसा जोपासणाऱ्या आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या उचगाव येथील २५ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावून साहित्याचा आनंद लुटला. गेल्या अनेक वर्षांपासून उचगाव येथे हे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सातत्याने भरते, ज्याचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष होते. यापूर्वीही या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती.यावर्षी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत देशमुख होते, तर कथाकार जयवंत आवटे, संजय उपाध्ये व अभिजीत कोष्टी यांच्या भारदार व बहारदार कार्यक्रमांनी संमेलनाला खऱ्या अर्थाने रंगत आणली. या मान्यवरांच्या मार्गदर्शनाने आणि साहित्याच्या सादरीकरणाने उपस्थित विद्यार्थी भारावून गेले.
महाविद्यालयाच्या मराठी विभागाची ही एक परंपराच असून दरवर्षी कुद्रेमणी, कडोली आणि उचगाव या ठिकाणी होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाला विद्यार्थ्यांची आवर्जून हजेरी असते. यावर्षीही मराठी विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. कुलकर्णी व डॉ. जी. वाय. कांबळे यांच्या उपक्रमशीलतेमुळे विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक २५ व्या संमेलनाचा लाभ घेता आला. या शैक्षणिक सहलीमध्ये अक्षय कांबळे, सलोनी कांबळे, एकादशी गावडे, सोनाली गावडे, अक्षता कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. केवळ व्याख्याने ऐकणेच नव्हे, तर प्रत्यक्ष नामवंत साहित्यिकांना भेटता आले आणि त्यांच्याशी संवाद साधता आला, हा अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय आणि आनंदाचा होता, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी दिली.

No comments:
Post a Comment