चंदगड : सी एल वृत्तसेवा
तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. कॉलेजमध्ये "राष्ट्रीय भूगोल दिन" उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. जी. खाडे तर प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून डॉ. जांभळे एस. जी. हे होते.
प्रमुख पाहुणे डॉ. जांभळे यांनी ,"जागर भूगोल दिनाचा" या विषयावर ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भूगोल तज्ञ सी. डी. देशमुख यांच्या कार्याची ओळख आणि भूगोल विषयातील त्यांचे योगदान यांची माहिती दिली. भूगोल दिनाचे महत्त्व विशद करताना भूगोल शिक्षकाच्या भूमिका व जबाबदाऱ्या यांचीही माहिती दिली. एक भूगोल शिक्षक म्हणून बी. एड. प्रशिक्षणार्थीनी विद्यार्थ्यांना भूगोलामध्ये अभिरुची निर्माण करण्यासाठी राबवयाचे उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली.
"भूगोल विषय हा आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्यामुळे तो जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. भूगोल विषयाचे उत्तम ज्ञान आपल्याला व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देते. यामध्ये हवामान विश्लेषक, नकाशा निर्मितीकार, नगररचनाकार, संशोधन, लेखन, पर्यटन मार्गदर्शक यासारख्या विविध संधी उपलब्ध होतात. भूगोल विषयांमध्ये अत्याधुनिक संकल्पना यामध्ये जी. पी. एस., दूर संवेदन, जी. आय. एस. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दैनंदिन जीवन सुलभ बनवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे सर्वांनीच भूगोलाचे महत्त्व समजून घेणे अत्यावश्यक आहे." असे प्रतिपादन त्यांनी केले.
मकर संक्रात दिनानिमित्त तिळगुळ कार्यक्रम झाला. अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. जी. खाडे यांनी मकर संक्रात या दिनाचे शास्त्रीय व भौगोलिक संबंध तसेच सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वही विद्यार्थ्यांना विशद करून सांगितले. यावेळी प्रा. एन. जे. कांबळे, प्रशिक्षणार्थी आदिनाथ गावडे, अविनाश गवळी यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी प्रा. मुल्ला एम. आर., प्रा. प्रधान ग. गो, प्रा. वाय. पी. पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुजाता कांबळे यांनी केले. आदिनाथ गावडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी सावंत यांनी केले.

No comments:
Post a Comment