चंदगड : प्रतिनिधी
"भारतीय सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. मात्र, बदलत्या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सहकार क्षेत्राने आता पारंपरिक चौकटीबाहेर पडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, शुभ्र क्राती 2.0 चा अवलंब करणे, अनिवार्य आहे," असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषी तज्ज्ञ व गोकुळ दूध संघाचे तज्ज्ञ संचालक डॉ. चेतन नरके यांनी केले.
येथील खेडूत शिक्षण मंडळाचे र. भा. माडखोलकर महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित 'आधुनिक भारतीय सहकार क्षेत्रातील आव्हाने व संधी' या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते
बीजभाषक म्हणून बोलत होते. ही परिषद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पुरस्कृत असून शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडली.
दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. चेतन नरके यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. महाजन, सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. एस. देशमुख, राणी चन्नम्मा विद्यापीठ (बेळगाव) येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. बी. एस. नावी, खेडूत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्रा. ॲड. एन. एस. पाटील, सचिव एम. एम. तुपारे, ज्येष्ठ संचालक प्रा. आर. पी. पाटील, महादेवराव वांद्रे, प्र प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल, समन्वयक डॉ. टी. ए. कांबळे आणि डॉ. ए. वाय. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नरके यांनी थायलंड सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून काम करताना आलेले अनुभव आणि तुलनात्मक माहिती विषद केले. "सहकारी संस्थांनी केवळ कर्जपुरवठ्यापुरते मर्यादित न राहता डेटा ॲनालिटिक्सचा वापर करावा. जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांना मोठी संधी आहे, फक्त त्यासाठी आधुनिक ब्रँडिंग आणि तंत्रज्ञानाची जोड हवी," असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सत्रांमधील अभ्यासपूर्ण मांडणी परिषदेच्या पहिल्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. एस. महाजन यांनी सहकार क्षेत्रातील सद्यस्थिती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी भविष्यातील आर्थिक बदलांची प्रभावी मांडणी केली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ऑडिटर प्रा. ॲड. एन. एस. पाटील होते. त्यांनी सहकार चळवळीचा इतिहास सांगून मार्मिक विवेचन केले. या सत्राचे आभार डॉ. ए. वाय. जाधव यांनी मानले.
दुसऱ्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. देशमुख यांनी आपल्या विषयाची विस्ताराने मांडणी केली. अध्यक्षस्थानी सरकारी महाविद्यालय धारवाड येथील वाणिज्य प्रमुख डॉ इराणा बुस्ताली होते, ज्यांनी उपस्थितांना प्रभावी मार्गदर्शन केले. डॉ देशमुख पुढे सहकारी आणि खाजगी संस्थाचा उद्देश भिन्न असल्याने केवळ सहकारी संस्थाच ग्रामीण विकास आणि सामाजिक- आर्थिक सर्वसमावेशकता साध्य करतात. या सत्राचे आभार डॉ. एस. एस. सावंत यांनी मानले.
तिसऱ्या सत्रामध्ये जिल्हा सहनिबंधक कोल्हापूर कार्यालयाचे श्री मुरुडकर यांनी सहकारातील सद्यस्थिती व प्रशासकीय धोरणात्मक आराखडा यावर विशेष मांडणी केली. तर चौथ्या सत्रामध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगांव येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. बी. एस नावी यांनी सहकार क्षेत्रातील शासन पद्धती आणि चिरस्थायी विकासाचे मॉडेल विस्ताराने विशद केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी धारवाड विद्यापीठाचे डॉ प्रवीण शिंदे होते.
शेवटच्या समारोप सत्र - खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक व माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या राष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला. यावेळी प्रा. दीपक कांबळे, प्रा चंद्रभागा गावडे व कु. प्राप्ती जाधव हिने आपले मनोगत व्यक्त केले.
या परिषदेत सहकार क्षेत्रातील विविध ११ उपविषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. देशभरातून आलेल्या संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले, ज्यांचे प्रकाशन ISSN मानांकित जर्नलमध्ये केले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्र प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी करून परिषदेच्या आयोजनाचा उद्देश विशद केला. सूत्रसंचालन डॉ. एन. के पाटील व प्रा. प्रियाका निटूरकर यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. टी. ए. कांबळे, डॉ. ए. वाय. जाधव यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment