![]() |
| दीपक दळवी |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद लढ्यातील दिग्गज नेते मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे आज मंगळवार दि. 17 मार्च 2026 रोजी दुपारी आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्यावर बेळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
सुमारे 70 ते 75 वर्षांपूर्वी मराठी भाषिक बांधवांना कर्नाटक राज्यात डांबण्यात आले आहे. तेव्हापासून कर्नाटकातील या मराठी बांधवांवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. कर्नाटकी जुलमी सत्तेपासून मराठी बांधवांना मुक्त करून बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 70 वर्षांपेक्षा अधिक काळ सीमा लढ्याची आंदोलने सुरू आहेत. सीमा प्रश्नी सुरू असलेल्या या लढ्यात सध्या तिसरी व चौथी पिढी कार्यरत आहे. या लढ्याच्या दुसऱ्या पिढीतील दिग्गज नेते मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन झाल्याने सीमा प्रश्नी सुरू असलेल्या लढ्यावर हा मोठा आघात ठरला आहे.
दळवी यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर पार्थिवावर आज सायंकाळी शहापूर- बेळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमा लढ्यातील एक अभ्यासू सेनापती हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या पुढील काळातही मराठी भाषिक भूभाग महाराष्ट्रात सामील होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणे हीच दळवी यांना श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या निस्वार्थी नेत्याला चंदगड तालुका पत्रकार संघ व चंदगड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली...!

No comments:
Post a Comment