मजरे कार्वे येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात; धर्म, संस्कृती व संघटन शक्तीचा जागर - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2026

मजरे कार्वे येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात; धर्म, संस्कृती व संघटन शक्तीचा जागर


चंदगड / प्रतिनिधी

    “धर्माचे रक्षण करणाऱ्यांचे धर्म स्वतः रक्षण करतो” या प्रेरणादायी विचाराने समाज प्रेरित होणे आवश्यक असून, हिंदू संस्कृती ही केवळ परंपरा नसून ती एक सशक्त जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन भद्रसेन प्रभू यांनी केले. ते मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होते.

    या भव्य संमेलनाला किसनजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच पंचक्रोशीतील हजारो हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    संमेलनाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने शोभायात्रेने झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत वारकरी संप्रदायातील भजनी मंडळे, महिला भजनी मंडळे आणि युवक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते.

    आपल्या भाषणात भद्रसेन प्रभू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा व धर्मरक्षणाच्या कार्याचा उल्लेख करत, आजच्या तरुणांनी त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे सांगितले. धैर्य, मानसिक खंबीरता, व्यसनमुक्त जीवन, स्त्री सन्मान आणि संघटित शक्ती या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. “समाज संघटित झाला तरच धर्म आणि संस्कृतीचे रक्षण शक्य आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

    प्रमुख वक्ते डॉ. दत्तात्रय गर्गे यांनी हिंदू धर्म, संस्कृती आणि समाज यांचे संरक्षण हेच राष्ट्र उभारणीचे भक्कम आधार असल्याचे सांगितले. देशाला परम वैभवाच्या दिशेने नेण्यासाठी सामाजिक एकजूट, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठा आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याबाबत मत व्यक्त करताना, संघाचे विचार व देशप्रेम समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

    यावेळी माधुरी सावंत-भोसले यांनीही प्रेरणादायी विचार मांडत महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

    या कार्यक्रमास जिल्हा संघचालक भास्कर कामत, राम महानूर, अॅड. विजय कडूकर, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, प्रशांत पाटील, गोपाळ ओऊळकर, शिवाजी तुपारे, जानबा चौगुले, अनंत भोसले, सुनील जोशी, गौरव सुतार, विठ्ठल सुतार, तेजस देवी, कमलेश सुतार, पांडुरंग परीट, धर्मेंद्र पटेल, शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती हारकारे यांनी केले, तर खेडूत संस्थेचे सचिव एम. एम. तुपारे यांनी आभार मानले.

    एकूणच, या विराट हिंदू संमेलनाच्या माध्यमातून धर्म, संस्कृती, सामाजिक एकजूट आणि राष्ट्रभावना यांचा प्रभावी जागर झाला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत सकारात्मक विचार आणि संस्कार जोपासण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.

No comments:

Post a Comment