चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोरज येथे श्री राम नवमी पांडुरंग सप्ताहानिमित्त एक अनोखा आणि भक्तिमय सोहळा रंगणार आहे. गावातील सुपुत्र आणि वारकरी परंपरेचा वारसा जपणारे बाल कीर्तनकार ह.भ.प. कु. ओम महाराज शिरगांवकर यांच्या कीर्तनाचा विशेष कार्यक्रम रविवारी, दि. 29 मार्च 2026 रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची तयारी सध्या उत्साहात सुरू असून, कोरजसह संपूर्ण चंदगड तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगवाणीचा गोडवा आणि रामनामाचा गजर यांचा सुरेख संगम या कीर्तनातून अनुभवायला मिळणार आहे.
अवघ्या इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या ओम महाराज यांनी अल्पवयातच कीर्तन, अभंग गायन आणि आध्यात्मिक प्रवचन यामध्ये उल्लेखनीय प्रावीण्य मिळवले आहे. ज्ञानोबा तुकोबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, तुरंबे येथे ते शिक्षण घेत असून, चंदगड तालुक्यातील पहिले बाल कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे नव्या पिढीत वारकरी संप्रदायाबद्दल आकर्षण आणि संस्कारांची रुजवात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या सोहळ्यात ओम महाराजांसोबत त्यांच्या बाल सवंगड्यांचाही सहभाग राहणार असून, लहान वयातच अध्यात्माची गोडी लागलेल्या या बालगोपाळांचे सादरीकरण उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहे.
सप्ताह मंडळ, समस्त ग्रामस्थ कोरज तसेच चंदगड तालुका व सीमा भाग वारकरी संप्रदाय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
रामनामाचा गजर, अभंगांची माधुर्य आणि बालकांच्या ओठातून प्रकटणारे अध्यात्म—या सर्वांचा संगम असलेला हा कीर्तन सोहळा कोरजमध्ये भक्तिभावाने ओथंबलेले वातावरण निर्माण करणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.



No comments:
Post a Comment