धर्म, परंपरा आणि संस्कृतीच्या जतनासाठी चंदगड शहरामध्ये गुरुवारी २६ रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2026

धर्म, परंपरा आणि संस्कृतीच्या जतनासाठी चंदगड शहरामध्ये गुरुवारी २६ रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन

चंदगड / प्रतिनिधी

    हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि जीवनमूल्यांच्या जतन व संवर्धनासाठी चंदगड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले असून, या धार्मिक व सामाजिक सोहळ्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

    गुरूवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री देव रवळनाथ मंदिराच्या मागील पटांगणात या भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “धर्मो रक्षति रक्षितः” या तत्त्वाचा जागर देत समाजात धर्मनिष्ठा, एकात्मता आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

    संमेलनाच्या पूर्वसंध्येला दुपारी ४ वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक ते श्री रवळनाथ मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक घोषणांनी सजलेली ही शोभायात्रा संमेलनाचे आकर्षण ठरणार आहे.

    या संमेलनास प.पू. श्री भगवानगिरी महाराज (नुल मठ) आणि प.पू. श्री हरीगुरू महाराज (रुद्रकेसरी मठ सेवा समिती, बेळगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच पुणे येथील धर्मजागरण सहसंयोजक श्री मिलिंद केशव वाईकर आणि हिंदू जनजागृती समितीच्या सौ. विजया वेसणेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून समाजप्रबोधनपर मार्गदर्शन करणार आहेत.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक लक्ष्मण गावडे, सहसंयोजक दयानंद काणेकर, सचिव अतुल दाणी यांच्यासह विविध गावांतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने कार्यरत आहेत. चंदगड तालुक्यातील जांबरे, उमगाव, न्हावेली, नागवे, आसगाव, इब्राहिमपूर आदी गावांतील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.

    या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजातील एकजूट अधिक दृढ होऊन सामाजिक सलोखा, धार्मिक अभिमान आणि संस्कारांची जपणूक यांना नवे बळ मिळेल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाने सर्व बांधव व भगिनींनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संमेलनाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment