चंदगडमध्ये आरबीएसके अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत चष्यांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2026

चंदगडमध्ये आरबीएसके अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत चष्यांचे वाटप

चंदगड / प्रतिनिधी

    राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, चंदगड येथे मंगळवार २४ रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत चष्मा वाटपाचा आणि आरोग्यदायी उपक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती प्रा. विलास नाईक होते. 

    यावेळी गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. मकानदार, सहाय्यक अधीक्षक काळेकर, केंद्रप्रमुख भादवनकर, समुपदेशक विनायक देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. आरबीएसके चंदगडचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कार्यक्रमा दरम्यान सभापती प्रा. विलास नाईक व गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.

    वैद्यकीय अधिकारी डॉ. मकानदार यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व इंटरनेटचा योग्य आणि मर्यादित वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. वाढत्या डिजिटल युगात डोळ्यांचे आरोग्य जपणे किती आवश्यक आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली.

    कार्यक्रमाची प्रस्तावना समुपदेशक विनायक देसाई यांनी केली. डॉ. स्नेहल पाटील यांनी आरबीएसकेच्या कामकाजाचा आढावा घेत पालकांना या योजनेचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले. आरबीएसकेचे नोडल अधिकारी डॉ. योगेश पवार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment