चंदगड / प्रतिनिधी
कला माणसाला जोडण्याचे काम करतात. मूल्याधिष्ठीत संस्कृती मानव जगला तर समाज सुदृढ होतो. मानवी जीवन समृध्द करण्याचे सामर्थ्य विविध कलांमध्ये व मानवी संस्कृतीमध्ये आहे. जीवनातील छोटे छोटे संस्कार माणसं घडवितात. नाट्यकला मानवतेचे नाते विकसित करते. सर्व कलातून सत्याचा विजय होतो, याची शिकवण मिळते. लोककला कुटुंब व्यवस्थेला बांधून ठेवतात. कलेच्या माध्यमातून संस्कृतीचं उत्खनन होतं." असे प्रतिपादन प्रा. (डॉ.) एन. डी. कार्वेकर यांनी केले. ते मौजे कार्वे (ता. चंदगड ) येथील सरस्वती वाचनालयाने आयोजित केलेल्या सतराव्या व्याख्यानमालेत 'आपल्या कला व आपली संस्कृती' या विषयातून पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. अध्यक्षस्थानी चंदगड पंचायत समितीचे सदस्य पांडुरंग बेनके होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी द्विशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले आणि सरस्वती वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष द. य. कांबळे (गुरुजी) यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रकाश दुकळे यांनी करून दिला.
डॉ. कार्वेकर पुढे म्हणाले की, "कला सामाजिक जीवनात प्रकाश पाडतात. सांस्कृतिक परंपरा व मूल्यांचे जतन करतात. कला कल्पना, भावना, विचार अभिव्यक्त करण्याचे माध्यम ठरतात. संस्कृतीमध्ये समाजाच्या संपूर्ण जीवनपध्दतीचा समावेश होतो. याच संस्कृतीचे संक्रमण पुढील पिढ्यांकडे होते. अशी
सामाजिक एकता, सांस्कृतिक वारसा जतन करून सामाजिक बदलाची प्रेरणा कला व संस्कृती देते. कला माणसाच्या सृजनशीलतेला चालना देते. कलेमुळे मानव समृध्द होतो. कला व संस्कृती समाजाला सुसंस्कृत, प्रगल्भ व संवेदनशील बनण्यास मदत करतात. जीवन सर्वांगसुंदर होण्यासाठी विविध कलांचा पाठपुरावा माणसाने करावा. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण हे नाटकाचे तीन अंक आहेत."
अध्यक्षस्थानावरून बोलताना पांडुरंग बेनके म्हणाले की, "व्याख्यानमाला समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. आजच्या तरुणांनी ज्ञानसाधना करावी. मोबाईलमधून तरुण पिढीने बाहेर पडावे आणि पुस्तकांची संगत करावी. समाजकार्यासाठी आक्रमक व्हावे लागते. समाजसेवेची प्रेरणा वाचनातून आणि आपल्या अवताल भवतालच्या सामाजिक भानातून मिळत असते."
याप्रसंगी नारायण ओऊळकर, एन. के. चाळूचे, संजय सुळेभावकर, जोतिबा आपके, विष्णू कार्वेकर, संभाजी कार्वेकर, प्रकाश कांबळे, पत्रकार राहुल पाटील, निंगाप्पा बोकडे, काजमिल फर्नांडिस, महादेव दुकळे यांच्यासह बहुसंख्य वाचक आणि श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर कांबळे यांनी तर आभार ॲड. कार्तिक पाटील यांनी केले.
व्याख्यानमालेचे संयोजन जॉनी फर्नांडिस, सौ. हेमिल फर्नांडिस, सौ. चंदा कांबळे, सुरेश कांबळे, राजू चिंचणगी, श्रीकांत कांबळे, अविनाश कांबळे यांनी केले.

No comments:
Post a Comment