कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेच्या स्वराज्यातील अभेद्य किल्ला म्हणून इतिहासात महत्त्व पावलेला रांगणा किल्ला आज अखेरच्या घटका मोजतो आहे. शासनाच्या संबंधित विभागाचे राज्यातील अनेक ऐतिहासिक गडकोट किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यापैकीच एक असलेला रांगणा किल्ला. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या दक्षिण भागात असलेल्या ऐतिहासिक पारगड, मनोहरगड, रांगणा, विशाळगड या किल्ल्यांना शिवकाळात तसेच त्यानंतर ब्रिटिश राजवटीत कोकण व पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व होते. तथापि ब्रिटिश व पोर्तुगीज राजवट संपल्यानंतर व भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वच किल्ले दुर्लक्षित झाले आहेत. अलीकडच्या काळात जागतिक वारसा स्थळ राष्ट्रीय वारसा स्थळ व राज्य वारसा स्थळ दर्जा मिळालेल्या काही अपवादात्मक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होत आहे. तथापि स्वराज्य रक्षणार्थ योगदान दिलेले अनेक किल्ले शासकीय अनास्थेमुळे आज अखेरच्या घटका मोजत आहेत. अशा किल्ल्यांना राज्यातील काही स्वयंसेवी संस्था व त्यांचे मावळे श्रमदानातून गडांचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातीलच एक म्हणजे शिवाज्ञा गडकोट संवर्धन संस्था.
या संस्थेच्या मावळ्यांनी श्रमदानातून एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात रांगणा किल्ल्याचे रांगडेपण टिकवून ठेवण्यासाठी जीवाचे रान करत गडाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. किल्ल्यावरील अत्यंत देखणा व गोमुखी बांधणीचा पूर्वे कडे तोंड करून असलेला हणमंत दरवाजा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. संरक्षणाच्या दृष्टीने केलेलं भक्कम बांधकाम व भव्यता आजही पाहता क्षणी दिसून येते. पूर्वेकडे घाटमाथ्यावर असणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्ग 'हणमंत' घाट यावरून याचे 'हणमंत दरवाजा ' असे नाव पडले आहे. काही लोक याला 'हळदीचे नेरूर दरवाजा' असेही म्हणतात. हा दरवाजा हत्ती सोंड माची जवळ आहे. कधीकाळी वैभवशाली दिवस पाहिलेल्या या किल्याच्या दरवाजांची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या दरवाजाच्या दोन बुरुजांपैकी एक बुरुज ४-५ वर्षांपूर्वी कोसळला आहे. किल्ल्याचे दरवाजे, बुरुज व दगडी भिंती झाडेझुडपे, वेलींनी वेढले आहेत. नुकत्याच गडावरील चार दरवाजे, बुरुज, भिंती यावरील झाडे झुडपे काढून शिवाज्ञा गडकोट संवर्धन च्या मावळ्यांनी मुक्त श्वास दिला असला तरी त्याला मर्यादा आहेत. महाराष्ट्र शासनाने अशा ऐतिहास ठेव्यांचे महत्त्व ओळखून त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे.
भुदरगड तालुक्याच्या पश्चिम टोकावर वसलेल्या रांगणा किल्ल्यावरील स्वच्छता संवर्धनाच्या कौतुकास्पद मोहिमेत शिवाज्ञा संस्थेच्या ७० मावळ्यांनी आपले योगदान दिले.



No comments:
Post a Comment