चंदगड: सी. एल. वृत्तसेवा
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे डॉ बाबासाहेब साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्ञान साधनेच वेड असायला हवे असा प्रभावी संदेश देत अॅड. एन. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचन, चिंतन आणि अभ्यासाची प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन अॅड. एन. एस. पाटील होते. त्यांच्या हस्ते विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना अॅड. पाटील म्हणाले, “एखाद्या गोष्टीचे वेड लावून घेतल्याशिवाय यश मिळत नाही. डॉ. आंबेडकरांचे विचारच समाजाला दिशा देणारे आहेत. ग्रंथालयाला शरण गेलात, वाचनाचा स्वीकार केलात, तरच अज्ञानातून मुक्ती मिळेल.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे व खजिनदार अनंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य आर. पी. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून बाबासाहेबांच्या महान कार्याचा आढावा घेत कार्यक्रमाची दिशा स्पष्ट केली.
लेखक संजय साबळे यांनी आपल्या मनोगतात “वाचन हा समृद्धीचा पाया असून विद्यार्थीदशेत वाचनाची सवय लागली, तरच प्रगतीची शिखरे गाठता येतात” असे प्रतिपादन केले.
यावेळी ज्येष्ठ संचालक प्रा. आर. पी. पाटील यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक कार्याचा, सामाजिक समतेसाठी दिलेल्या योगदानाचा तसेच ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या त्यांच्या अमूल्य मंत्राचा विद्यार्थ्यांवर होणारा प्रभाव अधोरेखित केला.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे ग्रंथपाल शरद हदगल यांनी आयोजित केलेले डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचे विशेष पुस्तक प्रदर्शन. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वाचनाची प्रेरणा घेतली. ज्ञान, विचार आणि वाचन संस्कृतीचा जागर करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल, प्रा. ए. व्ही. धायगुडे, प्रा. एस. एम. शेख, जे. जी. पाटील, व्ही. के. गावडे, टी. व्ही. खंदाळे यांसह सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. बी. सी. शिगांडे यांनी प्रभावीपणे केले, तर उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment