चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील कडलगे बुद्रुक येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात, विविध उपक्रमांनी आणि मोठ्या जनसहभागात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी व लेखक ॲड. डॉ. सुधाकर जोगळेकर (बौद्ध) उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी गावचे सरपंच परशराम उर्फ बाळू पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. गुंडुराव कांबळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी जयंतीचे महत्त्व स्पष्ट करत मंडळाच्या वर्षभरातील सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत सर्वांचे स्वागत केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पंचशील वाचन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे ॲड. डॉ. सुधाकर जोगळेकर यांनी आपल्या प्रभावी, परखड आणि आक्रमक भाषणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ संविधान दिले नाही, तर विचारांची क्रांती घडवली. त्यांनी अंधश्रद्धा, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध लढा देत समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. आजच्या तरुणांनी केवळ जयंती साजरी करून थांबू नये, तर त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल.”
ते पुढे म्हणाले, “समाजात अजूनही विषमता, अज्ञान आणि अन्यायाचे सावट आहे. या परिस्थितीत प्रत्येक तरुणाने शिक्षण, संघटन आणि संघर्ष या बाबासाहेबांच्या त्रिसूत्रीचा अंगीकार केला पाहिजे. सामाजिक परिवर्तनासाठी निर्भयपणे आवाज उठवणे, चुकीच्या प्रथांना विरोध करणे आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे हीच खरी आंबेडकरी चळवळ आहे.”
तसेच त्यांनी बौद्ध धम्माच्या मूल्यांवर प्रकाश टाकत सांगितले की, “बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून तो मानवतेचा मार्ग आहे. समता, बंधुता आणि करुणा या तत्त्वांवर आधारित समाज उभारणे हेच आजचे मोठे आव्हान आहे.” त्यांच्या या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी माजी सरपंच सुधाकर बुवा, माजी प्राचार्य ए. एस. पाटील, आदर्श शिक्षक नरेंद्र हिशोबकर, नारायण सामंत आदींनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच शिनोळी येथील उद्योजक व कॉमर्स ऑफ चेंबरचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन करत मंडळाला ५००१ रुपयांची देणगी जाहीर केली आणि सामाजिक कार्यात कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे आभार सचिन कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमास दूध संस्थेचे चेअरमन तानाजी पाटील, पिंटू हिशोबकर, एन डी पाटील गुरुजी, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील , पोलीस पाटील सागर कांबळे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रबोधन युवा मंच सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पी एस कांबळे यांनी केले. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते पिंटू हिशेब कर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो व बाबासाहेबांचा ग्रंथ मंडळाला दिला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
दुपारच्या सत्रात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि आतषबाजीच्या रोषणाईत निघालेली ही मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध व आदर्श ठरली.
संध्याकाळी स्नेही भजनानंतर सज्जन कांबळे नागावकर यांचा ‘गुणगान बाबासाहेबांचा’ हा जीवनचरित्रावर आधारित सांस्कृतिक संगीत कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद देत संपूर्ण वातावरण आंबेडकरी विचारांनी भारावून गेले.

No comments:
Post a Comment