चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग सेवा महामंडळाच्या चंदगड आगारांतर्गत चंदगड-पारगड या मार्गावर दररोज कर्तव्य करीत असलेल्या चालकांच्या वाहनांच्या समोरच्या मोठ्या काचेवर (विंडस्क्रीन) रस्त्यावरील झाडांच्या फांद्या लागून काच फुटत आहेत किंवा त्यात तडा जाणे अशा प्रकारच्या घटना सतत घडत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, चालकांना धोका निर्माण होण्यासोबतच महामंडळाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंदगड-पारगड मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कापून टाकाव्यात अशी मागणी पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी केली आहे.
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या फांद्या वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. याबाबत चालकांकडून तोंडी तसेच लेखी तक्रारी प्राप्त होत आहेत. परिणामी, सदर मार्गावर कर्तव्य करण्यास चालक नकारात्मक भूमिका घेत आहेत, ज्यामुळे भविष्यात या मार्गावर फेरी सोडणे कठीण होईल. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि चालकांच्या सुरक्षिततेचा विचार करता, सदर मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला येणाऱ्या झाडांच्या अतिरेकी फांद्या तात्काळ कापून घ्याव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन बांधकाम विभागाला देण्यात आलेले आहे.

No comments:
Post a Comment