
चंदगड : तहसीलदाराना निवेदन देताना शंकर मनवाडकर, नितीन पाटील, ॲड. संतोष मळवीकर, विठ्ठल गावडे, कृष्णा पाटील व अन्य मान्यवर.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात नागरी वसाहतीपर्यंत वन्यप्राण्यांचे अतिक्रमण सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत, तर सध्या रानडुकरांकडून होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना शेती पड ठेवावी लागत आहे. मात्र याकडे आवश्यक उपाययोजना करण्यात वनखात्याला अपयश येत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, यासाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकरी यांच्यावतीने चंदगड तहसील कार्यालयावर सोमवारी (दि. 13) एप्रिल २०२६ रोजी चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देऊन बळीराजा संघटनेचे राज्याध्यक्ष नितीन पाटील व सामाजिक कार्यकर्ते शंकर मनवाडकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
वाढत्या नुकसानामुळे शेतकरी आपली शेती पड ठेवत आहेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यासाठी पुढील काळात आवश्यक उपाययोजना कराव्यात, यासाठी हा मोर्चा आयोजित केल्याचे शंकर मनवाडकर यांनी सांगितले.
निवेदनातून शेतकऱ्याना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत, पिक विमा योजना प्रभावीपणे राबवाव्यात, वन्य प्राण्यांना जंगलातच पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करावी, रानडुक्कर मारण्यास परवानगी द्यावी, अशा विविध मागण्या सादर केल्या आहेत.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते नितीन पाटील, किणी येथील
सामाजिक कार्यकर्ते शंकर मनवाडकर, कृष्णा पाटील, ॲड. संतोष मळवीकर, चंद्रशेखर गावडे, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई, अशोक पेडणेकर, विठ्ठल तेजम, गोविंद गुडुळकर, तानाजी पवार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment