चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी प्राचार्य डॉ. गोरल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. एन. पाटील यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रभावी आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आपल्या विस्तृत भाषणात त्यांनी सांगितले की, महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते एक दूरदृष्टीचे विचारवंत होते. त्यांनी स्त्रीशिक्षण, शूद्र-अतिशूद्रांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला.
डॉ. पाटील म्हणाले, “आजच्या काळातही महात्मा फुले यांचे विचार अत्यंत सुसंगत आहेत. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या कार्यातून समाजात समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची रुजवात झाली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करताना महात्मा फुले यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला व कार्यक्रमाच्या उद्देशाची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल म्हणाले की, महात्मा फुले यांचे कार्य हे समाजाला दिशा देणारे असून त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे ही आजच्या पिढीची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतो, असे त्यांनी थोडक्यात नमूद केले.
या कार्यक्रमास डॉ. एस. एस. सावंत, डॉ. के. एन. निकम, स्टाफ सेक्रेटरी प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. पी. एल. भादवणकर, श्रीनिवास पाटील, डॉ. रंजना कमलाकर सूर्यवंशी यांच्यासह डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. एन. एस. मासाळ, प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने, मारुती माडखोलकर, डॉ. अंजली पाटील, सौ. चंदगडकर वहिनी तसेच बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शाहू गावडे यांनी मानले.

No comments:
Post a Comment