
माणगाव फाटा येथील व्हिजन सेंटर (दृष्टी केंद्र) हॉस्पिटलचे उद्घाटन करताना प्रसंगी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, राजेश पाटील, विद्या पाटील, विलास नाईक, के वाय पाटील आदी मान्यवर
चंदगड : सी एल वृत्तसेवा
एम. एम. जोशी- कोडकणी आय सेंटर बेळगाव यांनी सुरू केलेल्या डोळ्यांच्या हॉस्पिटलमुळे चंदगड तालुक्यातील रुग्णांची चांगली सोय होणार आहे. हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आलेली अत्याधुनिक उपकरणे व तज्ञ डॉक्टर याचा पाटणे फाटा परिसरासह चंदगड तालुक्यातील डोळ्यांच्या रुग्णांना नक्कीच फायदा होईल. रुग्ण व नातेवाईकांना बेळगाव, गडहिंग्लज, कोल्हापूर ला जावे लागणार नाही. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी केले. ते केदारनाथ कॉम्प्लेक्स, बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्ग, माणगाव फाटा (मजरे कार्वे) येथील एम. एम. जोशी- कोडकणी आय सेंटर (अयोध्या नगर बेळगाव) यांच्या महाराष्ट्रातील पहिल्याच शाखेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
रविवार दि ५/४/२०२६ रोजी सुरू करण्यात आलेल्या 'व्हिजन सेंटर' (दृष्टी केंद्र) या हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश पाटील होते. कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर शिल्पा कोडकणी (वैद्यकीय संचालक, एमएम जोशी - कोडकनी आय सेंटर, बेळगाव) यांनी केले. यावेळी उपस्थित कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक, माजी सभापती शांताराम पाटील, हेमरस साखर कारखान्याचे संस्थापक के. वाय. पाटील (कालकुंद्री) आदींनी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ उमेश के. पाटील, बाबू नेसरीकर, महेश डोंगरे (एमएम जोशी नेत्र संस्था, हुबळी), यशवंत जोशी, (पीआरओ, एमएम जोशी कोडकनी आय सेंटर, बेळगाव) आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद गावडोजी पाटील यांनी केले. कुतुबुद्दीन मुल्ला (सीईओ एमएम जोशी आय इन्स्टिट्यूट, हुबळी) यांनी आभार मानले.
हॉस्पिटल उद्घाटनाच्या दिवशी घेण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिरास तालुक्यातील रुग्णांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरातील मोफत तपासणी व औषधोपचाराचा ११० पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला.

No comments:
Post a Comment