पाटणे येथे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ११ ते १४ एप्रिल पर्यंत महोत्सवाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2026

पाटणे येथे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ११ ते १४ एप्रिल पर्यंत महोत्सवाचे आयोजन

चंदगड / प्रतिनिधी

    चंदगड तालुक्यातील पाटणे येथे युगपुरुष कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ११ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान विविध सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला भव्य महोत्सव आयोजित केला आहे. गावातील सर्व समाजघटकांना एकत्र आणत बंधुभाव, प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचा प्रसार करण्याचा उपक्रमामागे उद्देश आहे.

    महोत्सवाची सुरुवात शनिवार, ११ एप्रिल रोजी 'जयभीम चषक क्रिकेट क्रीडा, सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी स्पर्धे'ने होणार असून 'पाटणे प्रीमिअर लीग'च्या माध्यमातून गावातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवली आहेत. रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी 'युगपुरुष मॅरेथॉन स्पर्धा' आयोजित करण्यात आली असून त्याच दिवशी 'रक्तदान शिबिर' घेण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    सोमवार, १३ एप्रिल रोजी महिलांसाठी खास 'खेळ पैठणीचा' स्पर्धा होणार असून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी मुख्य जयंती दिनानिमित्त सकाळी ध्वजारोहण, बुद्धवंदना व प्रतिमा अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर खुल्या गटातील 'भाषण स्पर्धा' पार पडणार आहे. संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून प्रसिद्ध हलगी वादक किरण गोंधळी यांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून जाणार आहे. रात्री 'रेकॉर्ड डान्स स्पर्धा' होणार असून युवक-युवतींसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

    या चार दिवसांच्या महोत्सवातून सामाजिक एकोपा, युवकांमध्ये क्रीडा व सांस्कृतिक जाणीव आणि समता, बंधुता यांसारख्या मूल्यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न होत आहे. गावपातळीवर अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.

No comments:

Post a Comment