“तरुणांनी प्रामाणिकपणे काम केल्यास समाजात मोठी उंची गाठता येते” - ॲड. प्रा. एन. एस. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2026

“तरुणांनी प्रामाणिकपणे काम केल्यास समाजात मोठी उंची गाठता येते” - ॲड. प्रा. एन. एस. पाटील

चंदगड / प्रतिनिधी

    “प्रथमेश जाधव यांची धर्मादाय आयुक्त निरीक्षक पदी झालेली निवड ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नसून त्यासोबत प्रामाणिकपणा, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील जबाबदारी ही अत्यंत संवेदनशील असून समाजाचा विश्वास टिकवून ठेवणे ही मोठी जबाबदारी आहे. प्रथमेश यांनी आपल्या कामातून पारदर्शकता, नीतिमत्ता आणि सेवाभाव जपला तर ते निश्चितच मोठे यश संपादन करतील,” असे प्रतिपादन खेडूत शिक्षण संस्थेचे ऑडिटर, प्रा. ॲड. एन. एस. पाटील यांनी केले.

    चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात धर्मादाय आयुक्त निरीक्षक पदी निवड झालेल्या प्रथमेश मारुती जाधव (कोथळी. करवीर) यांचा संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला.

    प्रथमेश जाधव हे कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी गावचे असून ते माडखोलकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाकडील  डॉ. अरुण जाधव यांचे पुतणे आहेत. त्यांच्या कुटुंबात सामाजिक कार्याची परंपरा असून वडील मारुती जाधव हे गोकुळ दूध संघ, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण झाली आहे.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले, तर प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी आभार मानले.

    कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जी. एस. पाटील, माजी प्राचार्य व संचालक डॉ. पी. आर. पाटील, सचिव इंजि. एम. एम. तुपारे, ज्येष्ठ संचालक प्रा.आर. पी. पाटील, उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार आनंद सुतार, संचालक वामन सडेकर, संचालक शामराव मुरकुटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सत्कार समारंभामुळे महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रथमेश जाधव यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment