सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ स्पर्धा : गटशेतीतून समृद्धीकडे वाटचाल, नोंदणी करण्याचे तालुका मार्गदर्शक गणेश गायकवाड यांचे शेतकऱ्यांना आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2026

सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ स्पर्धा : गटशेतीतून समृद्धीकडे वाटचाल, नोंदणी करण्याचे तालुका मार्गदर्शक गणेश गायकवाड यांचे शेतकऱ्यांना आवाहन

चंदगड / प्रतिनिधी

    शेतकऱ्यांच्या एकजुटीला बळ देणारी आणि गटशेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्याचा मार्ग दाखवणारी पाणी फाऊंडेशनची “सत्यमेव जयते फार्मर कप 2026” ही स्पर्धा जाहीर झाली आहे. राज्यभरातील शेतकरी गटांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    एकट्याने शेती करताना बियाण्यांची समस्या, बाजारातील कमी भाव, तसेच नैसर्गिक संकटांचा सामना करणे अवघड जाते. यावर उपाय म्हणून गटशेतीचा पर्याय पुढे येत असून, या संकल्पनेला चालना देण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे. “एकट्याने नाही — एकत्राने पुढे” हा संदेश देत ही स्पर्धा शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    या स्पर्धेत विजेत्या गटांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ५० लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३० लाख रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय महिला गटांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांची विशेष पारितोषिके, तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवरही गौरव करण्यात येणार आहे.

    स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान ११ शेतकरी कुटुंबांनी एकत्र येणे आवश्यक असून, समान पीक घेणारे आणि एकूण किमान १५ एकर शेती असणे गरजेचे आहे. भात, भाजीपाला आणि नाचणी पिकांसाठी ही मर्यादा १० एकर ठेवण्यात आली आहे.

    नोंदणीसाठी “Smart Sheti App” डाउनलोड करून गटाची माहिती भरावी लागणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख पहिल्या टप्प्यासाठी १५ मे २०२६ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ३१ मे २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.

    महिला, पुरुष तसेच मिश्र गटांना सहभागाची संधी असून, विद्यमान बचत गट आणि आत्मा गटही या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. खरीप हंगामातील सर्व ३६ पिके स्पर्धेसाठी पात्र आहेत.

    शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेतीचा अवलंब केल्यास उत्पन्नवाढीसह शाश्वत शेतीची दिशा मिळू शकते. त्यामुळे या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी गणेश चंद्रकांत गायकवाड (चंदगड तालुका मार्गदर्शक) यांच्याशी 8605024126 या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment