चंदगड-आजरा-गडहिंगलज मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आमदार शिवाजी (भाऊ) पाटील प्रतिष्ठानचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2026

चंदगड-आजरा-गडहिंगलज मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आमदार शिवाजी (भाऊ) पाटील प्रतिष्ठानचे आवाहन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड-आजरा-गडहिंगलज मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना आमदार शिवाजी (भाऊ) पाटील प्रतिष्ठानतर्फे एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या विविध कारणांमुळे परगावी असलेले नागरिक आपल्या गावी परतत असून, लवकरच दहावी व बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी जातीचे प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.

    या अडचणी लक्षात घेता, मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील अशा विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून त्यांच्या टोकनची नोंद एकत्रित करावी आणि त्यांना आवश्यक दाखले मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वेळेत कागदपत्रे मिळाल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत अडथळे येणार नाहीत, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

    या संदर्भात जिथे गरज भासेल तिथे स्वतः पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांनी दिली आहे. “काम करूया, बदल घडवूया!” या संदेशासह कार्यकर्त्यांना समाजोपयोगी कामात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment