चंदगड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन प्रकरणे इथेच करण्यासाठी प्रयत्नशील...! सभापती नाईक, वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या शिक्षकांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2026

चंदगड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन प्रकरणे इथेच करण्यासाठी प्रयत्नशील...! सभापती नाईक, वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या शिक्षकांचा सत्कार

सत्कार करताना सभापती विलास नाईक व शिक्षक

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे दिडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदगड तालुक्यातील शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभाच्या रकमा मिळवण्यासाठी कोल्हापूरला हेलपाटे मारावे लागतात. ही गैरसोय टाळण्यासाठी वृध्द शिक्षकांनी कोल्हापूरला जाण्याऐवजी तेथील कर्मचाऱ्यांना आठवड्यातील एक दिवस चंदगड येथे बोलावून कामांची पूर्तता करावी. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  प्रतिपादन चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास दत्तात्रय नाईक यांनी केले. ते कार्वे (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना विरंगुळा केंद्रात आयोजित वार्षिक अधिवेशन, शिक्षक मेळावा व सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष शि. ल. होणगेकर होते. 

  कार्यक्रमाची सुरुवात सेवानिवृत्त शिक्षिकांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. एम. टी. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत कार्यकारी मंडळाने केले. अहवाल वाचन विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष वसंत जोशीलकर यांनी केले. यावेळी त्यांनी विरंगुळा केंद्र उभारणीसाठी जागा खरेदी व इमारत बांधकाम यासाठी सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांनी भरघोस आर्थिक मदत केल्याचे सांगून सुमारे ५० लाखांहून अधिक रकमेचे प्राथमिक शिक्षकांनी उभारलेले हे महाराष्ट्रातील एकमेव विरंगुळा केंद्र असल्याचे सांगितले. 

  यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी जि प सदस्य कल्लाप्पा भोगण, विलास भावकू पाटील, स. द. पाटील ब. धों. कांबळे, भि. नि. पाटील, एन. व्ही. पाटील, रंजीता देसुरकर आदींची भाषणे झाली. 

     मागील वर्षभरात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. यात महादेव केदारी आवडन (हलकर्णी), सुजाता ईश्वर कुंभार (माणगाव), शालिनी भीमसेन पाटील (कडलगे खुर्द), बसवंत धोंडीबा कांबळे (देवरवाडी) कृष्णा निंगाप्पा पाटील (सुंडी), सट्टूपा दत्तात्रय पाटील (कालकुंद्री), जयश्री मारुती कुंभार (चंदगड), धोंडीबा काळू पाटील (नागरदळे), गावडू भरमू पाटील (किणी) आदींचा समावेश होता. या सर्वांचे ७५ दिव्यांच्या आरतीने औक्षण करण्यात आले. याशिवाय वयाची नव्वदी पार केलेल्या वयोवृद्ध शिक्षकांचाही सन्मान नव्वदी पार केलेले माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

   चंदगड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी उभारलेले विरंगुळा केंद्र व संघटनेच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्ती शिक्षक संघ अंतर्गत कागल शाखेचे पदाधिकारी एस. बी. साठे, आनंदा डावरे, काकासो पाटील, विरगोंडा नाईक. पन्हाळा तालुका शाखेचे चंद्रकांत खोत, गणपती सूर्यवंशी, शिरोळ तालुका पदाधिकारी राजेंद्र येळगुडे, संभाजी कदम, राजेंद्र दिवटे, दिलीप कोळी, बाळासाहेब वळीवडे आदींची उपस्थिती होती. 

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णाप्पा वांद्रे यांनी केले. शं. का. शिंदे यांनी आभार मानले. 

 विरंगुळा केंद्राकडे जाणारा रस्ता करून देणार!

  यावेळी बोलताना गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर विलास पाटील म्हणाले विरंगुळा केंद्र हे बेळगाव वेंगुर्ले राज्य मार्गापासून १०० मीटर आत आहे. येथे येण्यासाठी रस्ता नाही. येथे कामानिमित्त येणारे बहुतांश गुरुवर्य हे  वयोवृद्ध असल्याने त्यांना इतरांचा आधार घेऊन चालावे लागते. दुचाकी किंवा चार चाकी गाड्या केंद्रापर्यंत येऊ शकत नसल्याने त्यांची गैरसोय होते. हे पाहून विलास पाटील यांनी आपल्या पत्नी व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील यांच्या माध्यमातून हा रस्ता डांबरीकरण करून देण्याचे जाहीर केले. याला उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

No comments:

Post a Comment