नागवेच्या मातीतून घडले दोन डॉक्टर; सख्या भाऊ-बहिणीची एमबीबीएसमध्ये प्रथम श्रेणीत यशस्वी भरारी, पालक गोविंद नाडगौडा यांच्या स्वप्नाला यशाचे पंख; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2026

नागवेच्या मातीतून घडले दोन डॉक्टर; सख्या भाऊ-बहिणीची एमबीबीएसमध्ये प्रथम श्रेणीत यशस्वी भरारी, पालक गोविंद नाडगौडा यांच्या स्वप्नाला यशाचे पंख; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श

डॉ. दर्शन गोविंद नाडगौडा          कु. हरिता गोविंद नाडगौडा


संपत पाटील, चंदगड :

    कोल्हापूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि निसर्गरम्य चंदगड तालुक्यातील नागवे गावाने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल छाप उमटवली आहे. शिक्षणाच्या मर्यादित सुविधा, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि ग्रामीण जीवनातील संघर्ष यांवर मात करत नागवे येथील सख्या भाऊ-बहिणीने एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून गावासह संपूर्ण चंदगड तालुक्याचा गौरव वाढवला आहे.

    पुणे येथे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणारे नागवे गावचे सुपुत्र गोविंद दत्ताराम नाडगौडा यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन डॉक्टर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. लहानपणी योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे आईचे आणि नंतर वडिलांचे निधन झाल्याची वेदना त्यांच्या मनात कायम होती. याच अनुभवातून त्यांनी आपल्या मुलांना वैद्यकीय क्षेत्रात घडवण्याचा निर्धार केला.

    या निर्धाराचे पहिले फळ दोन वर्षांपूर्वी मिळाले. त्यांचे सुपुत्र डॉ. दर्शन गोविंद नाडगौडा यांनी एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले असून ते सध्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावत आहेत. आता त्यांची कन्या कु. हरिता गोविंद नाडगौडा हिनेही एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन वडिलांचे स्वप्न पूर्णत्वास नेले आहे.

    नागवे हे गाव दत्तगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. वर्षातील सुमारे सहा महिने मुसळधार पाऊस आणि उर्वरित काळात शेतीवर आधारित जीवन अशी येथील परिस्थिती आहे. अनेक मूलभूत सुविधांपासून आजही वंचित असलेल्या या गावातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.    

    या यशामागे डॉ. दर्शन आणि कु. हरिता यांचे अथक परिश्रम, आई सौ. सुजाता गोविंद नाडगौडा यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच वडील श्री. गोविंद नाडगौडा यांची जिद्द, दूरदृष्टी आणि प्रेरणा यांचा मोठा वाटा आहे.

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत असून, शिक्षणाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचा हा जिवंत आदर्श मानला जात आहे. नागवे गाव, चंदगड तालुका तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून या यशस्वी भाऊ-बहिणीवर आणि त्यांच्या पालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने शिक्षणाची प्रेरणा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment