निट्टूर येथील आधार बहुउद्देशीय सेवा संस्थेचा रोजगार मेळावा उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2026

निट्टूर येथील आधार बहुउद्देशीय सेवा संस्थेचा रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

चंदगड / प्रतिनिधी

    आधार बहुउद्देशीय सेवा संस्था, निट्टुर यांच्या वतीने ४ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला भव्य रोजगार मेळावा उत्स्फूर्त प्रतिसादात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो युवक-युवतींना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली.

    मेळाव्याचे उद्घाटन संत गजानन महाराज ग्रामीण रुग्णालय, महागाव (ता. गडहिंग्लज) येथील  वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. यशवंत चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निट्टुरचे लोकनियुक्त सरपंच गुलाब पाटील होते. यावेळी महागावचे काकासाहेब चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष जी. आर. पाटील, डॉ. राजाराम साळुंके यांच्यासह गोवा, धारवाड, कोल्हापूर, पुणे आणि शिनोळी येथील विविध नामांकित कंपन्यांचे एचआर व्यवस्थापक व प्रतिनिधी, रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी, जय शिवराय सोसायटी, भैरवनाथ डेअरीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सैनिक संघटना, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. यशवंत चव्हाण यांनी आधार बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शैक्षणिक, सामाजिक आणि लोकाभिमुख कार्याचे कौतुक केले. युवक-युवतींनी अपयशाने खचून न जाता नोकरी करत असतानाच उद्योजक होण्याचे ध्येय ठेवावे आणि त्यासाठी सातत्याने परिश्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या शैक्षणिक व वैद्यकीय संकुलामार्फत दरवर्षी हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

  यावेळी संस्थेचे सदस्य तथा रॉयल क्लासेसचे संचालक युवराज मारुती पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन युवराज पाटील यांनी एमएचटी-सीईटी परीक्षेत १०० टक्के पर्सेंटाइल गुण मिळवून मुंबई महानगर विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा डॉ. चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

   सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचाही मेळाव्याच्या प्रतिसादावर परिणाम झाला नाही. निट्टुर पंचक्रोशीसह चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील युवक-युवती मोठ्या संख्येने मुलाखतीसाठी उपस्थित होते. संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, २७७ उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती, तर सुमारे ३० ते ३५ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी केली. मात्र, भडगाव पुलावरील पर्यायी रस्ता खचल्याने गडहिंग्लज तालुक्यातील सुमारे ५० ते ६० उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहता आले नाही.

    श्री गणेश प्राथमिक विद्यामंदिराच्या प्रशस्त वर्गखोल्यांमध्ये सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत शिस्तबद्ध पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या. विविध कंपन्या व बँकांच्या प्रतिनिधींनी एकूण ३४ उमेदवारांची प्राथमिक निवड केली असून, त्यांना चार ते आठ दिवसांत नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याचे सांगितले. काही उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रे मिळण्यास सुरुवात झाल्याची माहितीही संयोजकांनी दिली. या मेळाव्यातून किमान ५० ते ५५ युवक-युवतींना रोजगार मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

  निट्टुर पंचक्रोशीत प्रथमच अशा स्वरूपाचा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याने बेरोजगार युवक-युवती आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेळाव्याचे नियोजन, व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध आयोजन यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून, आधार बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment