![]() |
| संजय साबळे |
चंदगड (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर यांच्या सन २०२६–२७ या कार्यकाळासाठी गुणवंत खेळाडू सत्कार निधी समिती'च्या संचालकपदी न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील उपक्रमशील शिक्षक संजय गोपाळ साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिनांक ६ जुलै २०२६ रोजी संस्थेचे चेअरमन राजेंद्र मा. पाटील, व्हाइस चेअरमन प्रकाश रा. कोकाटे, सहतज्ज्ञ संचालक दादासाहेब ग. लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत मा. कुरडे तसेच संचालक मंडळाच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
संजय साबळे हे केवळ आदर्श शिक्षकच नव्हे, तर चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे मार्गदर्शक, कोजिम जिल्हा समन्वयक, उपक्रमशील शिक्षक आणि संवेदनशील कवी म्हणूनही परिचित आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवडीबद्दल चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने साबळे सरांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष मा. मोहन पाटील, बी. एन. पाटील, रवींद्र पाटील, महादेव शिवणगेकर, मुख्याध्यापक आनंद पाटील, व्ही. एल. सुतार, एच आर पाऊसकर , एस. पी. पाटील यांच्यासह संघाचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी साबळे सरांचे अभिनंदन करून त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षम नेतृत्वाचा लाभ पतसंस्थेला मिळून गुणवंत विद्यार्थ्यांच्या व खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी समिती अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


No comments:
Post a Comment