चंदगड / प्रतिनिधी
मुख्यमंत्री 'बळीराजा शेत पाणंद रस्ते अभियान' चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्त्यांच्या विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नामदेव पाटील यांनी भाजपच्या संघटनात्मक कार्यात अनेक वर्षे सक्रिय भूमिका बजावत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. तालुकाध्यक्ष म्हणून केलेले कार्य, संघटन कौशल्य आणि विकासाभिमुख भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे.
नियुक्तीनंतर नामदेव पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानाची चंदगड विधानसभा क्षेत्रात प्रभावी, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत काम केले जाईल. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते अभियानांतर्गत शेतकऱ्यांना शेतापर्यंत दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीमालाच्या वाहतुकीला चालना देणे आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी वर्गाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment