चंदगड : प्रतिनिधी
“लोकसंख्या ही केवळ वाढती संख्या नसून ती देशाची महत्त्वपूर्ण साधनसंपत्ती आहे. या लोकसंख्येला उत्तम शिक्षण, आरोग्य, कौशल्य आणि समान संधी उपलब्ध करून दिल्यास ती देशाच्या विकासाची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. त्यामुळे लोकसंख्येकडे समस्या म्हणून नव्हे, तर योग्य नियोजनातून विकासाच्या संधी म्हणून पाहण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले.
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभाग व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ. टी. ए. कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कांबळे यांनी वाढती लोकसंख्या, उपलब्ध साधनसंपत्ती, युवकांची क्षमता, शिक्षण, आरोग्य, औद्योगिकीकरण आणि स्त्री-पुरुष समानता अशा विविध पैलूंवर सविस्तर विवेचन केले. वाढत्या लोकसंख्येमुळे निवास, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि इतर मूलभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण होतो. उपलब्ध साधनसंपत्तीचे असमान वितरण झाल्यास सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकसंख्या वाढीबरोबरच उपलब्ध संसाधनांचे योग्य नियोजन आणि न्याय्य वितरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारत हा जगातील सर्वाधिक तरुण आणि कार्यक्षम लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. ही तरुणाई भारतासाठी मोठी ताकद आहे. मात्र या तरुणांच्या आशा-आकांक्षांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा, रोजगाराभिमुख कौशल्ये आणि समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तरुणांच्या क्षमतेचा सकारात्मक आणि विधायक उपयोग झाला, तर भारताची लोकसंख्या देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी वरदान ठरू शकते, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.
केवळ संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक लोकसंख्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सक्षम, सुशिक्षित, निरोगी आणि कौशल्यसंपन्न नागरिक हीच राष्ट्राची खरी संपत्ती असल्याचे नमूद केले. औद्योगिकीकरण आणि आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. लोकसंख्येचे योग्य नियोजन झाले, तर देशाच्या विकासाला अधिक गती मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुटुंब संस्थेनेही लोकसंख्येबाबत सकारात्मक आणि जबाबदार दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव न करता दोघांनाही शिक्षण, आरोग्य आणि प्रगतीच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. स्त्री-पुरुष समानता ही सक्षम आणि प्रगत समाजनिर्मितीची मूलभूत गरज आहे, असे सांगत लोकसंख्या, कुटुंबकल्याण आणि सामाजिक जबाबदारी याबाबत प्रत्येक नागरिकामध्ये जाणीव निर्माण होणे काळाची गरज असल्याचे डॉ. कांबळे यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणामांचा थोडक्यात आढावा घेतला. लोकसंख्या वाढ आणि उपलब्ध संसाधने यांच्यात समतोल राखण्यासाठी जनजागृती, शिक्षण आणि जबाबदार नागरिकत्व महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ सेक्रेटरी प्रा. व्ही. के. गावडे यांनी केले. सूत्रसंचालन भूगोलशास्त्र विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मासाळ यांनी केले, तर डॉ. ए. वाय. जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. जी वाय कांबळे, प्रा. सौ.एस वाय आरबळी, प्रा. एस. व्ही कुलकर्णी.प्रा. वैशाली दावणे महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:
Post a Comment