जांबरे येथील ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरुन पाणी वाहत आहे.
चंदगड तालुक्यातील मोठ्या तीन धरण प्रकल्पांपैकी एक असलेला झांबरे मध्यम प्रकल्प आज बुधवार दिनांक ८ जुलै २०२६ रोजी दुपारी तीन च्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून ५० क्युसेक्स तर विद्युतगृहातून १५० क्युसेक्स असा २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग ताम्रपर्णी नदीपात्रात सुरू आहे. आज रात्रीपर्यंत विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या वतीने ताम्रपर्णी नदी काठावरील सर्व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गतवर्षी झांबरे प्रकल्प २४ जून २०२५ रोजी दुपारी पूर्ण क्षमतेने भरला होता. म्हणजेच यंदापेक्षा तब्बल १४ दिवस आधीच प्रकल्प भरला होता.
याशिवाय आजच (दिनांक ०८/०७/२०२६ रोजी दु. १.०० वाजता) कळसगादे ल.पा. तलाव १००% भरला आहे. त्यामुळे स्थानिक ओढा व पर्यायाने ताम्रपर्णी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तालुक्यातील २३ लघुपट बंधारे धरणांपैकी पूर्ण क्षमतेने भरणारे कळसगादे हे पहिले धरण ठरले आहे. हे धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असलेने पर्यटकांना येणेस बंदी आहे. असे पत्रक पाटबंधारे विभाग दक्षिण कोल्हापूर यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
चंदगड तालुक्यातील पावसाचा जोर कालच्या तुलनेत आज काहीसा कमी असला तरी पाऊस पूर्ण थांबला नाही. पावसाची संततधार कालच्या प्रमाणे पुन्हा सुरू राहिल्यास तालुक्यात पूरस्थिती निर्माण होणार असून त्याचा फटका नदीकडच्या गावातील नागरिकांना बसू शकतो.
दरम्यान कालपासून आजपर्यंत चंदगड तालुक्यातील तब्बल १२ बंधारे पाण्याखाली आहेत. यात घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर, भोगोली, हिंडगाव, कानडी, सावर्डे, अडकुर, तारेवाडी तर ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कोणेवाडी, हल्लारवाडी व कोवाड ह्या बंधाऱ्यांचा समावेश आहे.

No comments:
Post a Comment