
पावसाने उसंत दिल्याने कोवाड येथील जुना बंधारा खुला झाला
चंदगड : प्रतिनिधी
गेल्या चार-पाच दिवसांपासून चंदगड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाने गुरुवारी काहीशी उसंत दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दुपारच्या सुमारास काही वेळ ऊन पडल्याने वातावरणातही बदल जाणवला.
आज चंदगडचा आठवडा बाजार असल्याने आणि पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी झाली. सलग पावसामुळे मागील काही दिवस बाजारपेठेत शुकशुकाट होता. मात्र आज व्यापारी आणि ग्राहकांची चांगली वर्दळ दिसून आली.
दरम्यान, पावसाचा जोर कमी झाला असला तरी तालुक्यातील घटप्रभा आणि झांबरे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे घटप्रभा व ताम्रपर्णी नदीच्या पाणीपातळीत अद्यापही अपेक्षित घट झालेली नाही. त्यामुळे नदीकाठच्या काही सखल भागांतील रस्ते आणि बंधारे अजूनही पाण्याखाली असून वाहतुकीवर परिणाम कायम आहे. पाणीपातळी संथ गतीने कमी होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जंगमहट्टी मध्यम प्रकल्प ६३.०४ टक्के भरला आहे.
दुसरीकडे, सलग पावसामुळे भात रोपलावणीच्या कामांना वेग आला होता. आज पावसाने काहीशी विश्रांती दिल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा जोमाने शेतीकामे सुरू केली. शिवारात शेतीच्या कामांची लगबग वाढल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
एकूणच, पावसाने दिलेल्या अल्प विश्रांतीमुळे नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी नदीकाठच्या भागांतील पाणीपातळी आणि बंद मार्गांमुळे सतर्कतेची गरज अद्याप कायम आहे.
No comments:
Post a Comment