चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमी, चंदगड संचलित महादेवराव बी. एड. कॉलेज, तुर्केवाडी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे अभ्यास केंद्र शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सुरू होत आहे. या केंद्राला एम.ए. शिक्षणशास्त्र (M.A. in Education) तसेच शालेय व्यवस्थापन पदविका (Diploma in School Management) या दोन अभ्यासक्रमांसाठी मान्यता मिळाली आहे.
एम.ए. शिक्षणशास्त्र हा पदव्युत्तर अभ्यासक्रम असून तो एम.एड. समकक्ष आहे. तर शालेय व्यवस्थापन पदविका हा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना मुख्याध्यापक अथवा प्राचार्य पदासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम आहे.
या दोन्ही अभ्यासक्रमांना चंदगड तालुक्यात प्रथमच सुरुवात होत असल्याने चंदगड, आजरा, गडहिंग्लज तसेच कर्नाटक, गोवा सीमाभाग आणि कोकण परिसरातील शिक्षकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. महादेवराव वांद्रे यांनी केले.
अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहेत. अर्ज भरताना ‘महादेवराव बी.एड. कॉलेज, तुर्केवाडी – केंद्र क्रमांक ७१ २९६’ हा पर्याय निवडावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. एस. जी. खाडे यांनी केले.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. एस. जी. खाडे (९४२१२१९८६७) किंवा केंद्र समन्वयक प्रा. कांबळे एन. जे. (८८८८०६७५४२) यांच्याशी संपर्क साधावा.
या अभ्यासक्रमाचे केंद्र सुरू करण्यासाठी संस्थाध्यक्ष डॉ. महादेवराव वांद्रे, कोल्हापूर विभागीय प्रमुख प्राचार्य डॉ. थोरात, सौ. सविता पाटील, यशवंत पाटील व संजय काटे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. अभ्यासक्रम सुरू झाल्याबद्दल शिक्षक, मुख्याध्यापक तसेच माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:
Post a Comment