मोबाईलला उपवास, बालपणाला श्वास!’, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा डिजिटल संयमाचा अनोखा संकल्प - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2026

मोबाईलला उपवास, बालपणाला श्वास!’, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा डिजिटल संयमाचा अनोखा संकल्प

 


चंदगड : प्रतिनिधी

भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध सणांच्या माध्यमातून संस्कार, संयम, शिस्त आणि चांगल्या सवयींची शिकवण दिली जाते. याच संस्कारपरंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे श्रावण महिन्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ‘मोबाईलचा उपवास’ हा अभिनव आणि काळाची गरज ओळखणारा उपक्रम राबविण्यात आला.

श्रावण महिन्यात दर सोमवारी अनेक जण उपवास करतात. मुले ही अनुकरणप्रिय असल्याने मोठ्यांच्या चांगल्या सवयींचे अनुकरण करतात. हाच विचार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ‘श्रावण महिना – मोबाईलमुक्त महिना’ करण्याची प्रेरणा देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रावण महिन्यात अनावश्यक मोबाईल वापर करणार नाही, गेम्स खेळणार नाही, रील्स व अनावश्यक व्हिडीओ पाहण्यात वेळ वाया घालवणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली.

आज मोबाईल हा शिक्षणासाठी उपयुक्त साधन असला, तरी त्याचा अनावश्यक वापर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहे. गेम्स, रील्स, शॉर्ट व्हिडीओ आणि सततचे स्क्रीन टाईम यामुळे अभ्यासाचा वेळ कमी होण्याबरोबरच झोप, एकाग्रता आणि डोळ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ‘मोबाईलचा उपवास’ म्हणजे मोबाईलचा पूर्ण त्याग नव्हे, तर त्याच्या अनावश्यक वापरावर संयम ठेवण्याचा संकल्प असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

‘मोबाईल कमी, पुस्तक जास्त; स्क्रीन कमी, मैदान जास्त!’ असा संदेश देत विद्यार्थ्यांना वाचन, मैदानी खेळ, कुटुंबीयांशी संवाद, छंद आणि सर्जनशील उपक्रमांकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमामुळे श्रावणातील पारंपरिक ‘उपवास’ या संकल्पनेला आधुनिक जीवनशैलीशी जोडत विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल शिस्त, वेळेचे नियोजन आणि आरोग्यदायी सवयी निर्माण करण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात आला.

या प्रसंगी प्राचार्य आर. पी. पाटील, उपप्राचार्य टी. एस. चांदेकर, पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर, सांस्कृतिक विभागप्रमुख संजय साबळे, ज्येष्ठ अध्यापक जे. जी. पाटील, क्रीडा शिक्षक टी. व्ही. खंदाळे यांच्यासह अध्यापकवर्ग उपस्थित होता.

‘या श्रावणात देवासाठी एक दिवस उपवास आणि स्वतःसाठी मोबाईलचा उपवास!’

या अभिनव संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल कमी करून त्यांच्या हातात पुस्तक, खेळाचे साहित्य आणि सर्जनशीलतेची साधने देण्याचा सुंदर संदेश दि न्यू इंग्लिश स्कूलने दिला आहे.

No comments:

Post a Comment