चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चंदगड बस डेपोला नुकत्याच ५ नवीन बस उपलब्ध झाल्यानंतर आता पुढील आठवड्यात गडहिंग्लज, आजरा बस डेपोसह चंदगड बस डेपोलाही आणखी नवीन बसेस उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. शिवाजीराव श. पाटील यांनी सकारात्मक चर्चा केली. यावेळी मतदारसंघातील वाढती प्रवासी संख्या, ग्रामीण भागातील बससेवेची आवश्यकता, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यांची सविस्तर माहिती देत बस ताफा वाढविण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीची दखल घेत पुढील आठवड्यात गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड बस डेपोसाठी आणखी बसेस उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंदगड बस डेपोला ५ नवीन बस उपलब्ध झाल्या आहेत. आता त्यात आणखी नवीन बसेसची भर पडणार असल्याने ग्रामीण भागातील बससेवा अधिक सक्षम होणार आहे.
नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर दुर्गम गावांतील फेऱ्या वाढविणे, प्रवाशांना वेळेवर व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच विद्यार्थी व कामगारांची गैरसोय दूर करण्यास मोठी मदत होणार आहे. चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील हजारो प्रवाशांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार असून एसटी सेवेची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे.
यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आपला पाठपुरावा यापुढेही सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.

No comments:
Post a Comment