श्री भावेश्वरी विद्यालय, नांदवडे (ता. चंदगड) येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण स्पर्धेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील एकूण ३५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या प्रभावी वक्तृत्व कौशल्याचे दर्शन घडविले.
स्पर्धेचे परीक्षण सौ. एस. आर. कोरवी, डी. जी. पाटील आणि एम. पी. नाईक यांनी केले. विद्यार्थ्यांच्या आशयपूर्ण मांडणी, आत्मविश्वास, भाषाशैली आणि सादरीकरणाचे त्यांनी बारकाईने मूल्यमापन केले.याप्रसंगी गोरख पथवे यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक यू. एल. पवार होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्वकला आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, असे सांगितले. तसेच भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. आभार प्रदर्शन सौ. एस. आर. कोरवी यांनी केले.


No comments:
Post a Comment