डॉ. बी. डी. सोमजाळ व अद्यापक बाबुराव वर्पे यांना दळवी प्रतिष्ठानचा 'जीवन गौरव पुरस्कार' - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2026

डॉ. बी. डी. सोमजाळ व अद्यापक बाबुराव वर्पे यांना दळवी प्रतिष्ठानचा 'जीवन गौरव पुरस्कार'

दळवी प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सपत्नीक स्वीकारताना बाबुराव वर्पे, सोबत दुसरे पुरस्कार प्राप्त डॉ सोमजाळ व मान्यवर 
चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूरचे वैद्यकीय अधिकारी तथा चंदगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ बी. डी. सोमजाळ व रामपूर (ता चंदगड) चे रहिवाशी व विद्यामंदिर बागिलगे शाळेचे अद्यापक बाबुराव वर्पे यांना डॉ. आर. एल. दळवी प्रतिष्ठान नागनवाडी (ता.चंदगड) यांच्या वतीने दिला जाणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

     प्रतिष्ठान मार्फत महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील समाजाभिमुख कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सन २०२६ मधील हा पुरस्कार बाबुराव वरपे व डॉ सोमजाळ यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रुपये ११ हजार, सन्मानपत्र, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

       वर्पे यांचा ३२ वर्षांच्या सेवाकाळात अनेक शाळांना जिल्हा व राज्यस्तरीय गौरव मिळवून देणेत मोलाचा वाटा असून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर, स्वेटर, स्पोर्टस् किट, गुणवत्ता विकास कार्यासाठी भरीव योगदान दिले आहे. याबरोबरचं प्रतिवर्षी विद्यार्थी व शेतकऱ्यांना काजू व इतर रोपांचे वाटप करुन पर्यावरणाला हातभार लावणे, भटक्या व वंचित समाजातील विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांना शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तू, अतिवृष्टी काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली आहे. 

    तर डॉक्टर सोनजाळ यांनी गेली अनेक वर्षे कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत हजारोंच्या संख्येने केलेले नसबंदी ऑपरेशन व त्यांचे रुग्णाभिमुख कार्य यांची दखल प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आली आहे.

      नागनवाडी पंचक्रोशीतील गरिबांचे धन्वंतरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कै. डॉ. आर. एल. दळवी यांनी चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगरकपारी, ऊन, पाऊस,  चिखल, ओढे, नाले, नदी यांची तमा न बाळगता ६० वर्षे रुग्णांना सेवा दिली. मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून संपूर्ण जीवन व्यतित केलेल्या दळवी यांच्या नावाने सुरू असलेल्या प्रतिष्ठानचे कार्य समाजाला दिशादर्शक ठरले आहे.

       चंदगड येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एन. एस. पाटील होते. प्रास्ताविक शंतनू दळवी यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अजयकुमार दळवी, सचिव विजयकुमार दळवी, ॲड. रमेश मिसाळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन सुरेखा मिसाळे यांनी केले. स्नेहल दळवी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment