पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती, भातपिके पाण्याअभावी वाळून करपू लागली; तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2026

पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती, भातपिके पाण्याअभावी वाळून करपू लागली; तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

 

ऊन्हामुळे वाळत असलेली पिके

कोवाड : संजय पाटील, सी.एल. वृत्तसेवा

    चंदगड तसेच गडहिंग्लज तालुक्यासह परिसरात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी वर्गाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप हंगामातील भातपीक काढणीच्या उंबरठ्यावर असताना पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी भातपिके पाण्याअभावी वाळून करपू लागली आहेत. त्यामुळे कष्टाने उभे केलेले पीक हातातोंडाशी आले असताना वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

    यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी भातासह विविध पिकांची लागवड केली. मात्र, पीक वाढीच्या आणि दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. जमिनीतील ओलावा कमी होत असून भाताच्या पानांचा रंग बदलून अनेक ठिकाणी पिके सुकू लागली आहेत.

    भात हे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख खरीप पीक असल्याने पावसाच्या लहरीपणाचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होणार आहे. उत्पादनात मोठी घट झाल्यास शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, मजुरी, बियाणे, खते आणि औषधांचा खर्च यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच पीक हातचे गेल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

सरकारने तातडीने पंचनामे करून वस्तुस्थितीची पाहणी करावी

    पावसाअभावी नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी करून महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करावेत. पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार नुकसानभरपाई व आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

    पावसाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने विलंब न करता संबंधित भागात सुका दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची परिस्थिती तपासावी, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment