“शिक्षक हा समाजाचा शिल्पकार; ज्ञानासोबत जीवनाला दिशा देण्याचे कार्य शिक्षकांनी करावे”- सुबराव पवार - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2026

“शिक्षक हा समाजाचा शिल्पकार; ज्ञानासोबत जीवनाला दिशा देण्याचे कार्य शिक्षकांनी करावे”- सुबराव पवार

 


कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा 

 शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था, गगनबावडा आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समिती यांच्या वतीने कोल्हापूर शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

   या उपक्रमांतर्गत महानगरपालिका ए स्तर पॅटर्न स्कूल क्रमांक ७३, कनानगर, उर्दू-मराठी शाळा क्रमांक ५३, सदर बाजार आणि कर्मवीर भाऊराव पाटील शाळा क्रमांक १२, कदमवाडी येथील शिक्षकांचा शैक्षणिक साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीचे राज्याध्यक्ष सुबराव रामचंद्र पवार यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना “गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ आहे. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे. चांगला शिक्षक चांगला विद्यार्थी घडवतो, चांगला विद्यार्थी सक्षम समाज घडवतो आणि सक्षम समाजच राष्ट्र घडवतो.” आजच्या बदलत्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने, शासनाची शिक्षणविषयक भूमिका, आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणामध्ये वाढता वापर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, मूल्याधिष्ठित शिक्षण तसेच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे मार्गदर्शन आदी विषयांवर पवार यांनी विचार व्यक्त केले.

    सर्वोदय शैक्षणिक संस्था, गगनबावडा चे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रफिक काझी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक विकास न करता त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा, विविध परीक्षा, सांस्कृतिक स्पर्धा तसेच अन्य शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केल्यास विद्यार्थ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम शिक्षकांना मिळेल, असे प्रतिपादन केले. रफिक काझी यांना राज्य पुरस्कारामुळे मिळालेल्या दोन जादा वेतनवाढींमधून मिळणाऱ्या रकमेतून दरवर्षी गोरगरीब, गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच आवश्यक वस्तूंचे वाटप करतात. आजपर्यंत त्यांनी या उपक्रमातून सुमारे ३५०० गरजू विद्यार्थ्यांना मदत केली असून, शिक्षक दिनानिमित्त सुमारे ४५० शिक्षकांचा त्यांच्या शाळेत जाऊन मानसन्मान केला आहे.

  यावेळी कनानगर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अत्तार, सदर बाजार शाळेचे मुख्याध्यापक डबीर, कदमवाडी शाळेचे मुख्याध्यापक डांगरे व सर्व अध्यापक उपस्थित होते.

   याप्रसंगी सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी बी. डी. सुतार, हनीफ नाकाडे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीचे राज्य पदाधिकारी सुनील जाधव, अब्दुल सत्तार रिकिबदार, मुबारक शेख तसेच विद्यार्थी उपस्थित होते. डांगरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment