'कुळवाडी हे कुणबीच' बेळगाव व अन्य गॅझेट मधील नोंदी शोधून चंदगड तालुक्यातील मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन...! प्रशासनाला निवेदन, मनोज जरांगे- पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास पदयात्रेतून पाठिंबा - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2026

'कुळवाडी हे कुणबीच' बेळगाव व अन्य गॅझेट मधील नोंदी शोधून चंदगड तालुक्यातील मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन...! प्रशासनाला निवेदन, मनोज जरांगे- पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास पदयात्रेतून पाठिंबा

ढोलगरवाडी फाटा ते पाटणे फाटा पदयात्रेनंतर पाटणे फाटा चौकात झालेल्या कोपरा सभेत प्रशासनाला निवेदन देताना मराठा समाजाचे प्रतिनिधी, यावेळी उपस्थित मराठा बांधव

 चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   मराठा योद्धा मा. मनोज जरांगे- पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी चंदगड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने ढोलगरवाडी फाटा ते पाटणे फाटा पदयात्रा काढून पाठिंबा व्यक्त केला. रविवार दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या आंदोलनात तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

   मराठा समाजाचा पिढीजात शेती व्यवसाय आता आर्थिक दृष्ट्या परवडत नाही परिणामी अनेक गरीब शेतकरी आत्महत्या करत आहेत. मराठा तरुणांनी वयाची पन्नाशी ओलांडली तरी लग्ने ठरत नाहीत. कारण त्यांना नोकरी, रोजगार नाही. एकंदरीत मराठा समाज हालाकीचे जीवन जगत आहे. या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्व. आण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ मध्ये मुंबई येथे भव्य मोर्चा काढला. तेव्हापासून सुरु झालेल्या या लढ्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. २०१४ साली दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केले. सन २०१६ मध्ये मराठा क्रांती मोर्चाने ५८ मुक मोर्चे शांततेच्या मार्गाने काढून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर २०१८ साली १३% आरक्षण दिले. तेही सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. २०२३ पासून मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षण हक्काची लढाई सुरु केल्यानंतर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सरकारने SEBC अंतर्गत १०% आरक्षण दिले आहे. पण मनोज जरांगे यांनी मराठा समाज कुणबी असल्याने OBC प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. त्यानुसार न्या. शिंदे आयोगाने महाराष्ट्रातील शिक्षण, महसूल इत्यादी विभागांमध्ये कुणबी नोंद शोध मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये ५८ लाख तर चंदगड तालुक्यामध्ये अल्प प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या आहेत. चंदगड तालुक्यातील दऱ्या खोऱ्यामध्ये राहणाऱ्या गरीब, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात 

१) चंदगड तालुका पूर्वी बेळगाव जिल्ह्यात समाविष्ट असल्याने सर्व अभिलेख बेळगाव येथे असणार आहेत. याबाबत मुंबई गॅझेटियर अंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील दफ्तर नोंदी तपासाव्या. २) चंदगड महाल पूर्वी कुरुंदवाड संस्थानाशी ही संलग्नित असल्या कारणाने कुरुंदवाड संस्थानाची कागदपत्रे तपासावीत. ३) मराठा समाजाला कुणबी अंतर्गत OBC दाखले देताना कुळवाडी (कुलवाडी) जातीचा समावेश करावा कारण कुळवाडी याचा अर्थ कुणबी आहे. महात्मा फुलेनेही छत्रपती शिवाजी राजेना 'कुळवाडी भूषण' असे म्हटले आहे. चंदगड तालुक्यातील अभिलेखांत अनेक ठिकाणी कुळवाडी जातीचा उल्लेख आहे. वरील मागण्याबाबत तात्काळ कार्यवाही सुरु करावी अन्यथा सकल मराठा समाज चंदगडच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा देण्यात आला आहे. 

   निवेदनावर प्रा दीपक रामकृष्ण पाटील, नितीन नारायण पाटील, कल्लाप्पा  भोगण, विष्णू गावडे, शंकर मनमाडकर, पांडुरंग बेनके, शंकर कोले, चंद्रशेखर गावडे, राहुल कोंडेकर, संदीप भोगण, सुभाष पाटील आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment