‘वडाखालचा राजा’ मंडळाच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध तपासण्यांसह आरोग्य सल्ल्याचा सुमारे २०० नागरिकांनी घेतला लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2026

‘वडाखालचा राजा’ मंडळाच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध तपासण्यांसह आरोग्य सल्ल्याचा सुमारे २०० नागरिकांनी घेतला लाभ

 


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

    लक्ष्मीनगर, कोवाड येथील लक्ष्मीनगर तरुण मंडळाच्या ‘वडाखालचा राजा’ गणेशोत्सवानिमित्त बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे २०० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.

शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दात तपासणी, हाडांची तपासणी, रक्तातील साखर (शुगर), रक्तदाब (बीपी) तसेच नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली. यासोबतच नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन व सल्लाही देण्यात आला.

यंदा हे मंडळाचे पहिलेच वर्ष असून याच वर्षापासून ‘वडाखालचा राजा’ गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक उपक्रम न राबविता सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय असून झिम्मा-फुगडी, हरिपाठ, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मोफत आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

आरोग्य शिबिरासाठी बेळगाव येथील भाटे हॉस्पिटल व साई दीप आय हॉस्पिटल यांच्या आरोग्य पथकाने सहभाग घेतला. भाटे हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी बसवराज दुर्ग्नावर, नर्सिंग स्टाफमधील सानिका कोटे व अश्विनी कांगेरी, सहायक शानुर अंनगोळकर तसेच साई दीप आय हॉस्पिटलचे टेक्निशियन समिना दिलावर खान, व्हिक्टोरिया वीर नायक, सहायक आसिफ दिलावर खान व जनसंपर्क अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सेवा दिली.

तसेच कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक अमित लोहार, आशा स्वयंसेविका सुनीता पाटील, शीतल जाधव व नंदिनी पाटील आणि कोवाड येथील डॉ. विक्रांत विलास बोरगावकर यांची उपस्थिती होती.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक उपक्रम राबविल्याबद्दल नागरिकांकडून मंडळाच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

No comments:

Post a Comment