चंदगड शहरामध्ये शुक्रवारी दहीहंडीचा थरार, प्रशांत अनगुडे यांचा पुढाकार, ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची बक्षीसे - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2026

चंदगड शहरामध्ये शुक्रवारी दहीहंडीचा थरार, प्रशांत अनगुडे यांचा पुढाकार, ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची बक्षीसे


चंदगड : प्रतिनिधी

    श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने चंदगड तालुक्यात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मैदानावर दहीहंडीचा थरार रंगणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख दहीहंडी उत्सवांपैकी एक ठरणाऱ्या या सोहळ्यात ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे विक्रमी बक्षीस हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.  या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र बांधकाम उद्योगसेनेचे अध्यक्ष तथा खालसा कोळींद्रे येथील प्रशांत अनगुडे यांनी चंदगड येथे आयोजित प्रत्रकार परिषदेत दिली. 

    तालुक्यातील युवकांच्या ऊर्जेला विधायक दिशा मिळावी, ग्रामीण भागातही शहराच्या धर्तीवर दहीहंडी उत्सवाची परंपरा रुजावी, क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान युवकांना व्यासपीठ मिळावे, युवकांमध्ये संघभावना निर्माण व्हावी तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशांत अनगुडे यांनी सांगितले.

    श्री. अनगुडे यांच्या पुढाकारातून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना एकत्र आणून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडी उत्सवाबाबत तालुक्यासह परिसरातील गोविंदा पथके आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment