विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून आपले उच्च ध्येय कष्टाने साध्य करावे. - प्रा. एन. एस. पाटील, भगतसिंग अकॅडमीत यशस्वी विद्यार्थी व पालकांचा गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2026

विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून आपले उच्च ध्येय कष्टाने साध्य करावे. - प्रा. एन. एस. पाटील, भगतसिंग अकॅडमीत यशस्वी विद्यार्थी व पालकांचा गौरव



चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून आपले उच्च ध्येय कष्टाने साध्य करावे असे प्रतिपादन प्रा. एन. एस. पाटील यांनी केले. ते हलकर्णी फाटा येथील भगतसिंग अकॅडमी च्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स मध्ये निवड झालेल्या यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

   भगतसिंग अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष भरत गावडे यांनी प्रास्ताविकात अकॅडमीच्या कार्यामुळे ग्रामिण भागातील शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांचे पर्यायाने त्या कुटुंबांचे भले झाले होत आहे. अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाल्याने गरीब कुटुंबांच्या प्रगतीस हातभार लागत असल्याचे सांगितले. विद्यार्थी व युवकांमध्ये अलीकडच्या काळात चंगळवाद बोकाळला असून त्यांनी डॉल्बी, जून्या चुकीच्या रुढीपरंपरा, अंधश्रद्धा यामध्ये अडकून न राहता सुसंस्कृत ज्ञान व प्रगतशील विचारसरणी जोपासावी असे आवाहन केले. यावेळी त्यांनी अकॅडमीच्या गेल्या वीस वर्षातील कार्याचा आढावा घेतला.

  यावेळी प्रमुख पाहुणे मधुकर जाधव म्हणाले लहानपणापासून विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी ठेवावी, मोठे साम्राज्य निर्माण करणेसाठी छोट्या-छोट्या गोष्टीतही प्रामाणिक प्रयत्न यशाचे शिखर गाठत असतात असे सांगितले. महादेवरांव वांद्रे इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष महादेवराव वांद्रे म्हणाले चंदगड सारख्या दुर्गम तालुक्यातून आज अनेक विद्यार्थ्यांनी जिद्द आणि कष्टाने देश-विदेशात मोठी झेप घेतली आहे. तरुणांनी जीवनाचा पाया भक्कम करणेचे आवाहन केले. उपक्रमशील शिक्षक बाबुराव वरपे म्हणाले, परिस्थिती कशीही असो, ती बदलण्याची ताकद शिक्षणात आहे. नशीबाला दोष न देता मेहनत व जिद्दीने यश मिळवणेचे आवाहन केले. यावेळी आर. बी. गावडे, अशोक दळवी, पुंडलिक पाटील आजींची उपस्थिती होती. यावेळी शिप बिल्डर्समध्ये निवड झालेले विद्यार्थी कृष्णा प्रकाश पाटील बोंजुर्डी, साहिल सदानंद गावडे आसगांव, संस्कृती सुनिल गावडे नागनवाडी, सानिका अर्जून बांदेकर तांबुळवाडी, मृणाली रमाकांत मिलके तांबुळवाडी, वरुणा विजय लोंढे निट्टूर, सुजल महेश जायगडे साखरपा- किरबेट व त्यांच्या आई-वडीलांचा सत्कार करणेत आला. यावेळी शंकर पाटील, अशोक गावडे, संदीप म्हाडगुत, वाघमारे, पुंडलिक पाटील, भरत गावडे या मार्गदर्शक शिक्षकांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन अजित पाटील यांनी केले. संदीप म्हाडगुत यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment