चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर यंदा नागरिकांनी खरेदीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि मोठमोठ्या मॉलऐवजी आपल्या स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक आधार देऊन त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रत्येकाने स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करण्याचा संकल्प करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि खरेदीचा सण आहे. या सणानिमित्त प्रत्येकजण नवीन कपडे, फराळाचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, भेटवस्तू आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करतो. मात्र, अलीकडच्या काळात ऑनलाइन खरेदी आणि मोठ्या मॉलकडे ग्राहकांचा वाढता कल यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. आधीच विविध आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांसमोर त्यामुळे आव्हाने निर्माण झाली आहेत.
स्थानिक व्यापारी हे आपल्या गावाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या या व्यापारी बांधवांना सणासुदीच्या काळात ग्राहकांनी साथ देणे गरजेचे आहे. स्थानिक बाजारपेठेत खरेदी केल्यास व्यापाऱ्यांना आर्थिक बळ मिळण्याबरोबरच बाजारपेठेची उलाढाल वाढेल. तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासही मदत होईल.
आपण केलेली खरेदी ही केवळ वस्तूंची देवाणघेवाण नसून स्थानिक व्यवसायाला दिलेले प्रोत्साहन आहे. त्यामुळे यंदा दिवाळीचा आनंद द्विगुणित करताना स्थानिक व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे हास्य फुलवूया. ऑनलाइन खरेदी आणि मोठ्या मॉलमधील खरेदीला फाटा देऊन आपल्या गावातील व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करण्याचा निर्धार करूया.
ऑनलाइन खरेदी टाळूया, आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांना साथ देऊन आपल्या लोकांची दिवाळी गोड करूया!

No comments:
Post a Comment