चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तीन तालुक्यांमध्ये पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. या परिस्थितीचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसू नये, यासाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्याची आग्रही मागणी आमदार शिवाजीराव श. पाटील (शिवाभाऊ) यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे निवेदन सादर केले आहे. चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे शालांत परीक्षा शुल्क तसेच इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुष्काळामुळे अनेक शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून मुलांचा शैक्षणिक खर्च भागविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून संपूर्ण सवलत देण्यात यावी. यापूर्वी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले असल्यास ते परत करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शुल्कमाफीच्या निर्णयासाठी आवश्यकतेनुसार संबंधित शिक्षण विभाग आणि शासनस्तरावर तातडीने प्रस्ताव सादर करून सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
"दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना त्याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होता कामा नये. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे एकाही विद्यार्थ्याची परीक्षा देण्याची संधी हिरावली जाऊ नये. शेतकऱ्यांच्या हितासोबतच त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही आमचा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील," अशी भूमिका आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी व्यक्त केली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी अपेक्षा पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment