चंदगड: सी एल वृतसेवा
अध्यापन केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे साधन न मानता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे, सर्जनशीलतेचे आणि आनंददायी शिक्षणाचे माध्यम बनविणाऱ्या दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील शिक्षक श्री. संजय गोपाळ साबळे यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) यांच्यावतीने प्रतिष्ठेचा ‘आयडॉल शिक्षक सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील बहुआयामी योगदानाची या सन्मानाच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.
संजय साबळे हे केवळ एक शिक्षक म्हणून नव्हे, तर मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील आणि आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. मराठी अध्यापक संघ, कोल्हापूर जिल्ह्याचे सक्रिय सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. अध्यापनाच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन शिक्षणात नवनवीन प्रयोग राबविणे, विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करणे आणि वर्गखोलीतील वातावरण आनंददायी व उत्साहपूर्ण बनविणे, ही त्यांच्या अध्यापनाची वैशिष्ट्ये आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनातील सुप्त कलागुणांना वाव देत शिक्षणाशी त्यांची नाळ अधिक घट्ट जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शिक्षण म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसून जीवन समृद्ध करणारी प्रक्रिया आहे, हा दृष्टिकोन त्यांच्या शैक्षणिक कार्यातून दिसून येतो. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा विचार करून अध्यापनात सर्जनशीलता आणण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही साबळे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. उत्कृष्ट निवेदक, प्रभावी गायक, संगीतकार आणि उत्तमशील शिक्षक म्हणून ते परिचित आहेत. शब्द, स्वर आणि विचार यांच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधण्याची त्यांची कला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी उंची देते. मराठी भाषेची गोडी, साहित्याची अभिरुची आणि सांस्कृतिक जाणिवा नव्या पिढीमध्ये रुजविण्याच्या दृष्टीने त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे पुरेसे नाही, तर त्यांच्यात विचारक्षमता, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. अशा काळात संजय साबळे यांच्यासारखे प्रयोगशील शिक्षक शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे काम करतात. त्यांच्या कार्याचा झालेला राज्यस्तरीय गौरव हा केवळ एका शिक्षकाचा सन्मान नसून आनंददायी, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षणपद्धतीला मिळालेली पोचपावती आहे.
त्यांना प्राप्त झालेल्या ‘आयडॉल शिक्षक सन्माना’मुळे चंदगडच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन होत असून पुढील शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment