![]() |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत संचलित न्युट्रीयट्सन कंपनीने थकीत देणी द्यावीत. या मागणीचे निवेदन देताना. |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत संचलित न्युट्रीयंट्स कंपनीने शेतकरी,
कामगार, तोडणी-वाहतुकदार यांची 22 कोटी रुपयांची देणी देणेची आहेत. त्यामुळे
शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. न्युट्रीयट्स कंपनीने येत्या 15 दिवसात सर्वांची
देणी देवून कारखाना सुरु करावा. अन्यथा कार्यक्षेत्रातील शेतकरी व कामगार दौलत साखर
कारखान्याचा ताबा गोदामातील साखरेसकट घेतील अशा आशयाचे निवेदन तहसिलदार शिवाजी
शिंदे यांना देण्यात आले आहे.
सन 2016-17 या गळीत हंगामात दौलत साखर कारखाना कोल्हापूर जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेने गोकाकच्या न्युट्रीयट्स ॲग्रो फ्रुट्स प्रा.
लि. या कंपनीला भाडेतत्वार चालविण्यात दिला होता. या हंगामातील शेतकऱ्यांची सात
कोटीच ऊस बिले, कामगारांचे दहा कोटीचे वेतन व तोडणी व वाहतुकदार यांचे पाच कोटी
रुपये येणे आहेत. गेली एक वर्षे नऊ महिने झाले तरी अद्याप हि देणी मिळालेली नाहीत.
त्यामुळे शेतकरी व कामगार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर
उपासमारीची वेळ आली आहे. न्युट्रीयट्स कंपनीला दौलत कारखाना 45 वर्षाच्या
कालावधीसाठी भाडे तत्वावर चालविण्याला दिला होता. सन 2017-18 च्या गळीत हंगामात
कंपनी कारखाना चालविण्याला अपयशी ठरली. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस अन्यत्र गळीतासाठी
पाठविताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
दौलतच्या व्यवस्थानाबरोबरच कारखाना अडचणीत आणण्याचे काम कोल्हापूर
जिल्हा मध्यवर्ती बॅँक व न्युट्रीयंट्स कंपनीने केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक
शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकरी, कामगार व तोडणी-वाहतुकदार
यांची देणी देऊन न्युट्रीयंट्स कंपनीने येत्या 15 दिवसात देवून कारखाना सुरु केला
नाही. तर कार्यक्षेत्रातील शेतकरी व कामगार दौलत साखर कारखान्याचा ताबा गोदामातील
साखरेसकट घेतील. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सभापती बबन देसाई, प्रा. एन.
एस. पाटील, ॲड. संतोष मळविकर, रमेश देसाई, कृष्णा पाटील, रवि
नाईक यांच्या सह्या आहेत.