कुर्तनवाडीचे सरपंच अजयकुमार पाटील यांचा अपघाती मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2018

कुर्तनवाडीचे सरपंच अजयकुमार पाटील यांचा अपघाती मृत्यू

अजयकुमार पाटील
कुर्तनवाडी (ता. चंदगड) येथील बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील शिंदे सॉ मिलजवळ रस्त्याच्या कडेला गाडीवरून उतरत असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये अजयकुमार नारायण पाटील (वय-38, रा. कुर्तनवाडी, ता. चंदगड) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की - शिंदे सॉ मिलजवळ म्हारतळ नावाच्या शेताजवळ अजयकुमार पाटील हे आपली हिरो होंडा फॅशन प्लस दुचाकी (क्र. एम एच 09, बी. ई. 5366) गाडी थांबून उतरत असताना पाठीमागून विना नंबरची यामाहा गाडी वरून आलेल्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, यामध्ये अजयकुमार पाटील हे उडून रस्त्यावर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांच्या तोंडातून व नाकातून रक्त आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णांलयात त्यांना दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजित पाटील हे कोरज, कुर्तनवाडी, गंधर्वगड या ग्रुप ग्रामपंचायतीचे बिनविरोध निवडून आलेले सरपंच होते. हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात ते परिचित होते. बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या गुडेवाडी विद्यालयात ते परिचर म्हणून नोकरीस होते. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन लहान मुलगी भाऊ असा परिवार आहे.
वाढदिनीच अजयकुमारवर काळाचा घाला
सरपंच अजयकुमार पाटील यांचा आज रविवार दिनांक 14 ऑक्‍टोबर रोजी वाढदिवस होता. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळी त्यांचा साधे पद्धतीने वाढदिवस साजरा करणार होते. पण वाढदिवस त्यांच्यावर काळाने घाला घातला.
खासदार संभाजीराजे यांचे कडून गंधर्वगडला दहा लाखाचा निधी
अजयकुमार पाटील हे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच होते. 5 ऑक्‍टोबर रोजी खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीमध्ये गडावर 10 लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ केला होता. यावेळी खासदार संभाजीराजे यांचा अजयकुमार पाटील यांनी सत्कार केला होता. हा त्याच्या हस्ते शेवटचा सत्कार ठरला.