विद्यार्थ्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन वाढविण्यासाठी इस्त्रोशी करार करणार – शिक्षण सभापती अंबरीश घाटगे - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2018

विद्यार्थ्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन वाढविण्यासाठी इस्त्रोशी करार करणार – शिक्षण सभापती अंबरीश घाटगे


भावी पिढी सुसंस्कारित घडवायची असेल तर शाळेपासून राजकारण लांब ठेवा. शाळेत आपलीच मुलं शिकतात. त्यामुळे ती शाळा सर्व सोयींनीयुक्त समृद्ध झाली पाहिजे. यासाठी मुलांच्या शैक्षणिक गरजांना प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांकडे विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागावा. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने इस्त्रोशी करार करणार असल्याची माहिती शिक्षण व अर्थ समिती सभापती अंबरीश घाटगे यांनी दिली. चंदगड येथे तहसिल कार्यालयात प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आयोजित केलेल्या `माझी शाळा समृद्ध शाळा` या अंतर्गत कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती बबन देसाई होते.
चंदगड येथील शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या `माझी शाळा समृद्ध शाळा` या अंतर्गत कार्यशाळेत बोलताना शिक्षण व अर्थ समिती सभापती अंबरीश घाटगे, शेजारी ग. अ. आर. बी. जोशी, सभापती बबन देसाई, सचिन बल्लाळ आदी.

शिक्षण सभापती श्री. घाटगे पुढे म्हणाले, `` सर्वांनी मिळून शाळेत शैक्षणिक साधनांची उपलब्धता केली पाहिजे. 14 व्या वित्त आयोगातून आवश्यक असलेल्या वस्तू खरेदीसाठी प्रस्ताव पाठवा त्याला मंजुरी देऊ. शाळेत शैक्षणिक साहित्य साधने उपलब्ध व्हावीत. विद्यार्थ्यामध्ये लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी इस्त्रो या संस्थेशी करार करणार आहे. इस्त्रोच्या माध्यमातून प्रत्येक तालुकास्तरावर अद्यावत लॅब सुरू करणार आहे. जि. प. च्या माध्यमातून डास निर्मूलन मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेतून तालुका डासमुक्त होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कोल्हापूर येथे चंदगडवासियांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या चंदगड भवनासाठी अर्थ विभागातून निधीची तरतूद करून काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेणार असल्याचे सांगितले.``
प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी एन. बी. हालबागोळ यांनी करून चंदगड तालुका डोंगराळ असला तरी गुणवत्तेत सतत अग्रेसर असून तालुक्यात 80 लाखांचा शैक्षणिक उठाव झाल्याचे सांगितले. यावेळी सभापती बबन देसाई, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, प्रा. रमेश भोसले आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शैक्षणिक उठावा अंतर्गत शाळांना मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाला माजी सभापती शांताराम पाटील, जि. प. सदस्य विद्या पाटील, उपसभापती विठाबाई मुरकुटे, सरपंच माधुरी सावंत-भोसले,   परशराम सातार्डेकर, वाय. के. चौधरी यांच्यासह सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एम. टी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा सुभेदार यांनी आभार मानले.