हत्तीचे
माहेरघर असलेल्या हेरे - गुडवळे परिसरात हत्तीच्या कळपाकडून रोजचे नुकसान सुरुच
असून हत्तींच्या कळपाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान केल्यामुळे शेतकरी
हवालदिल झाला आहे. या परिसरात हत्तींनी गेल्या चार दिवसापासून मुक्काम ठोकला आहे. हेरे परिसरात हत्तीच्या कळपाकडून पंडीत तानाजी पाटील, दत्तात्रय
तुकाराम पाटील, पुंडलिक तानाजी पाटील, मुरली
शंकर पाटील, बाबुराव धोंडीबा गावडे, जानकु
रवळू अनगुडे, शिवाजी धाकू अनगुडे, राणबा
विठोबा अनगुडे यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
दरवर्षी उद्भवणाऱ्या हत्ती समस्येमुळे शेतकरी वर्ग पुरता मेटाकुटीला आला आहे. हत्तींचा
कळपाचा हेरे परिसरात मोठ्या प्रमाणात वावर आहे. या हत्तीच्या कळपामध्ये दोन हत्ती
व पिलाचा समावेश आहे. पिलू असल्यामुळे हत्ती सैराभैर असून खाण्यापेक्षा तुडवून नुकसानच
अधिक प्रमाणात होत आहे.
शेतीच्या रखवालीसाठी जाणारे शेतकरी जीव मुठीत घेवून रखवाली करत आहेत.
हत्तीच्या कळपाच्या आगमनामुळे शेतकरी वर्ग भितीच्या छायेत आहे. हत्तीकडून हा त्रास
रोजचा असल्यामुळे शेती करण्यासाठी बाहेर पडायचे की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना
पडला आहे. दिवसा जंगलात मुक्काम करायचा व रात्रभर शेतकऱ्यांची पिके फस्त करायची
असा हत्तीचा रोजचा दिनक्रम सुरु आहे. कधी-कधी दिवसाही हत्तीकडून नुकसान केले जात
आहे. हत्तीच्या या रोजच्या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे
वनविभागाने हत्तीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचालावीत अशी मागणी
शेतकऱ्यांतून होत आहे.