नागवे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवास करताना हाडे होतात खिळखिळी - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2018

नागवे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवास करताना हाडे होतात खिळखिळी


नागवे (ता. चंदगड) येथील गावाला जोडणारा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या सहा किलोमीटरच्या रस्त्यावरुन प्रवास करताना हाडे खिळखिळी होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येतो. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रस्त्यावरील खडी उचकटून रस्त्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे यावरुन चालत जाणेही जिकिरीचे बनले आहे. यासाठी मोर्चे, आंदोलने करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

इनाम कोळींद्रे ते नागवे रस्त्याची झालेली दुरावस्था.


इनाम कोळींद्रे ते नागवे या सहा किलोमीटरच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दुरावस्था झाली आहे. इनाम कोळींद्रे फाटा ते इनाम कोळींद्रे हा रस्ता चांगला आहे. परंतु त्यापुढे श्रीपादवाडी नागवेकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यानंतर साधी दुरुस्ती झालेली दिसत नाही. याच मार्गावर श्रीपादवाडी हे श्री दत्त गिरी महाराजांचे समाधीस्थळ असून मंदिराला भेट देण्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह कोकण, कर्नाटक गोव्यातील भाविक येत असतात. दरवर्षी दत्तजयंतीला येथे मोठा उत्सव भरतो. या उत्सवाला हजारो भाविक येथे आवर्जून हजेरी लावतात. शाळा, महाविद्यालयासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरदार, प्रापंचिक कामाला जाणारे ग्रामस्थ व महिला यांचे या रस्त्याने प्रवास करताना प्रचंड हाल होतात. नव्याने डांबरीकरण दूरच, परंतु साधे खड्डेही भरले जात नाही. गेल्या चार वर्षात अनेकदा मोर्चे, आंदोलने केली. निवेदने दिली, परंतु शासनाकडून आश्वासनांच्या पलिकडे काहीही हाती पडले नाही. हा ग्रामस्थांचा अनुभव आहे. प्रशासनाने लोकांची गैरसोय दुर करण्यासाठी तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.